शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात, संजय राऊतांचा आरोप

शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात, संजय राऊतांचा आरोप

शिवसेनेतील १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात आहेत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला आणि भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत. जे आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी पुन्हा शिवसेनेशिवाय निवडून येऊन दाखवावे असा थेट इशारा संजय राऊत यांन दिला आहे. काल रस्त्यावर जे उतरले होते तेच खरे शिवसैनिक आहेत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधला आहे. ईडीच्या किंवा अन्य काही अमिषाला बळी पडले असतील. स्वतःला वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही आहेत. रस्त्यावर जे उतरले होते तेच खरे शिवसैनिक आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पक्ष मजबूत आहे. पक्षाचे आमदार, खासदार गेले याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही. जे आमदार सोडून गेलेत त्यांची कारणं समोर येतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शिंदेंसोबत गेलेले आमदार पुन्हा येत आहेत. जे दोन आमदार पळून आले ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते घडलेला प्रकार सांगणार आहेत. कशा पद्धतीने आमदारांना जबरदस्तीने नेलं हे सांगणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री वर्षावरुन मातोश्री या निवसास्थानी दाखल झाले आहेत. ते कोणत्याही आमदारांची बैठक घेणार नाहीत. शिवसेना आजही पक्ष मजबूत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर जात असताना जे काही कार्यकर्ते रस्त्यावर होते ती खरी शिवसेना आहे असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे २० आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर मोठा खुलासा होईल. अशा परिस्थितीचा आम्हाला अनुभव आहे. बाळासाहेबांचं भक्त असणं पुरेसं नाही. आमच्यावरसुद्धा दबाव आहे. एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसला आहे. आमच्या कुटुंबावरसुद्धा केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे. परंतु आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबासोबत राहणार असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


मविआ सत्ता पाडण्याच्या प्रयत्नात दहिसरमधील ‘या’ आमदारांचा सहभाग


First Published on: June 23, 2022 12:29 PM
Exit mobile version