राज्यातील ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

राज्यातील ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. अशातच राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच, राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (maharashtra weather update unseasonal rain warning in some parts of madhya maharashtra including marathwada)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याचे याआधीच हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. शिवाय, किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात पावसाची शक्यता असताना दुसरीकडे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे थंडी अचानक वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये सोमवारीही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आज पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील २४ तासांत जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि यूपीच्या काही भागात गारपीट होऊ शकते.

दिल्लीत आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आणि कमाल 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच, मंगळवारी थंडी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारी किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 22 अंशांपर्यंत जाऊ शकते. मात्र, आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान 10 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – मुंबईतील १२ विभागांत आज पाणी नाही; ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

First Published on: January 30, 2023 8:54 AM
Exit mobile version