आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल : जयंत पाटील

आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल : जयंत पाटील

‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल’, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. आज आदरणीय शरद पवारसाहेब (Sharad Pawar) यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. (mahavikas aghadi fourth candidate will win with good votes says Jayant Patil)

‘अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते परंतु समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी (BJP) उत्तरप्रदेशमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा मुलाधार तोच आहे त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील’, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा – …म्हणून सेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

‘सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार (MLA) हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही असेही जयंत पाटील म्हणाले. मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच ना. या निवडणूका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच त्यात दोष देण्याची गरज नाही पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील’, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

‘आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत त्या सर्वांसाठी ही बैठक होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु’, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची, महेश तपासेंची टीका

First Published on: June 7, 2022 1:53 PM
Exit mobile version