पवारसाहेबांना UPA चे अध्यक्ष करा, भारताला फायदा होईल, देता प्रस्ताव?; नीलम गोऱ्हेंचा यशोमती ठाकुरांना टोला

पवारसाहेबांना UPA चे अध्यक्ष करा, भारताला फायदा होईल, देता प्रस्ताव?; नीलम गोऱ्हेंचा यशोमती ठाकुरांना टोला

शरद पवार मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं, असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांनी केलं. यावरुन बरीच चर्चा सुरु असताना त्याला शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांनी यावरुन यशोमती ठाकुर यांना टोला लगावला आहे. पवार साहेबांना युपीएचे (UPA) अध्यक्ष करा, संपूर्ण भारताला फायदा होईल. देता का प्रस्ताव? असा टोला गोऱ्हें यांनी लगावला.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम रविवारी अमरावतीत पार पडला. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी शरद पवार मुख्यमंत्री असायला हवे होते अशी इच्छा बोलून दाखवली. याला नीलम गोऱ्हें यांनी ट्विट करत यशोमती ठाकुर यांना उत्तर दिलं. “यशमोती ठाकुर यांनी असं विधान केलं आहे की शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे वेगळं चित्र दिसले असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर शंकाच नाही आहे. मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं. म्हणजे संपूर्ण भारताला उपयोग होईल. असा प्रस्ताव द्याल का यशोमतीताई?” असा उपहासात्मक टोला नीलम गोऱ्हें यांनी लगावला.

यशोमती ठाकुर काय म्हणाल्या?

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची ५७ वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम रविवारी अमरावतीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यशोमती ठाकुर म्हणाल्या,”साहेब एवढा भयाण हल्ला झाला. प्रत्येकजण मला विचारत होते येणार आहेत का साहेब….पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. तुम्ही थकत कसे नाही. आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात आणि तुम्ही थाबंत कसे नाही. कौतुकच वाटतं. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जी करता, ती ती अंगी वळणी पाडण्यासारखी आहे. साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात…तर महाराष्ट्राचं चित्र अजून काही राहिलं असतं. चार वेळा साहेब मुख्यमंत्री होते. पण आज काळाची गरज आहे. पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी काहीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार.”


हेही वाचा – पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्रच वेगळच असतं – यशोमती ठाकुर


 

First Published on: April 11, 2022 8:20 AM
Exit mobile version