मेगा भरती आम्हालाच एके दिवशी ढकलून देईल – रावसाहेब दानवे

मेगा भरती आम्हालाच एके दिवशी ढकलून देईल – रावसाहेब दानवे

“मेगा भरती आम्हालाच एके दिवशी ढकलून देईल,” असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. “भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात माणसं येत होती आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो,” असेही दानवे म्हणाले. ते वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रियमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

नविन कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या

पुढे रावसाहेब दानवे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात माणसं येत होती आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो. का? मेगा भरती चालली, भीती अशी वाटते की भरती एके दिवशी आम्हालाच ढकलून देईल बाहेर,” असे दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. “पण इतकं सोपं नाही,” असेही दानवे म्हणाले. “एक काळ असा होता जेव्हा एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्षे लागायची, तो ३० वर्षं पक्षाचं काम करायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. काही मतदार संघात पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल का? हे दिवस बदलले आहेत. भाजपामध्ये जी मेगा भरती सुरु आहे. जे कार्यकर्ते पार्टी बदलून आपल्या पक्षात आले. ते सहज आले नाहीत, विचार करून आले आहेत,” असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मेगा भरतीत पक्षात आलेल्यांना सांभाळून घेण्याविषयी कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले की, “भाजपात येण्यापूर्वी नेत्यांना या पक्षात गेल्यावर जमेल का? ते सांभाळून घेतील का? या प्रश्नांनी रात्रभर झोपच लागत नसे. पण त्यांनी हिम्मत केली आणि पक्षात आले. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना मी विनंती विनंती करतो की, नवीन कार्यकर्त्यांना बैला सारखे शिंग नका मारू, सांभाळून घ्या,” असे आवाहन दानवे यांनी केले आहे.

हेही वाचा – घोट्याळ्यात आता पवारांचे नाव कसे आले? एकनाथ खडसेंना शंका

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

यावेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “आम्ही धाक दाखवून पक्षात कार्यकर्ते घेतो,” म्हणून आमच्यावर टीका झाली. असे म्हणत दानवे पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. कार्यकर्ते समजावत असतानाही त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही. तर काँग्रेसच्या खालच्या फळीतील कार्यकर्त्यांना वाईट वाटून ज्या ठिकाणी सोय होईल तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते जात आहेत,” असा टोला दानवेंनी यावेळी काँग्रेसला लगावला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील टोला लगावला. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सत्तेत असताना चांगली वर्तणूक मिळाली नाही. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील माणसं श्रीमंत आहेत. पण त्यांचा पक्ष गरीब झाला आहे. त्यामुळे भाजपची हवा आहे, असे वाटून कार्यकर्ते भाजपाकडे येत आहेत.”

ईडीची प्रकरणं आजची नाही

ईडीची कारवाईवर शरद पवार यांनी निवडणुका जवळ आल्याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे, असे सांगून रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, “जे गुन्हे दाखल झाले आहेत ते आज घडलेले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बँक बरखास्त केली. तेव्हा अजित पवार संचालक होते. संबंधित बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बरखास्त केली. १३ कारखान्यांना १ हजार कोटींपेक्षा कर्ज तुम्ही दिलं. ते कारखाने दिवाळखोरीत निघाले. आणि ते कारखाने विकत घेणारे कोण? ज्यांनी त्या कारखान्यांनाच दिवाळखोरीत काढलं?” असा सवाल करत ईडीच्या कारवाईवर दानवेंनी म्हणणे मांडले.

First Published on: September 25, 2019 8:03 PM
Exit mobile version