ग्रामीण विद्यार्थ्यांना मुंबईतून ‘वैद्यकीय’ प्रशिक्षण !

ग्रामीण विद्यार्थ्यांना मुंबईतून ‘वैद्यकीय’ प्रशिक्षण !

प्रातिनिधिक फोटो

बऱ्याचदा ग्रामीण भागातील एमबीबीएस करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, अनेक कारणांमुळे इच्छुक कॉलेजमध्ये प्रवेश घेणं शक्य होत नाही. अशावेळी त्या विद्यार्थ्यांचा पूर्णपणे हिरमोड होऊन जातो. मात्र, अशा विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणं आता सहज शक्य होणार आहे. कारण ग्रामीण विद्यार्थ्यांना आता मुंबईमधूनच एमबीबीएसचं प्रशिक्षण (लेक्चर्स ) देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी ऐरोलीला एक खास सेंटर सुरु करण्यात आलं आहे. या सेंटरमध्ये गोंदियाच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं प्रशिक्षणासाठी दिलं जात असून, याचा फायदा एकाचवेळी महाराष्ट्रातील १७ मेडिकल कॉलेजेसमधल्या एकूण २ हजार ३०० मुलांना होतो आहे. बुधवारपासून या प्रशिक्षण सीरीजला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी मुलांना प्रशिक्षण दिलं आहे. तसंच या सीरिजमध्ये विविध कॉलेजमधील जेष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचं प्रशिक्षण त्या त्या कॉलेजेसच्या हॉलमधूनच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे ‘मुंबईतल्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला नाही’, ही खंत ग्रामीण मुलांच्या मनातून कमी व्हायला कुठेतरी मदत होणार आहे.

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

ऐरोली येथील सेंटरमधून सुरुवातीला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना एकाच विषयाचं प्रशिक्षण दिलं जातं. जो विषय शिकवला जाणार आहे, तो आधीच व्हॉट्स अॅपवरुन विद्यार्थ्यांना पाठवला जातो. प्रत्येक कॉलेजमध्ये एक स्क्रिन बसवण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या वेळेस दोन तासासाठी विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं जातं. प्रशिक्षण देणाऱ्या डॉक्टरांचं नावही आधीच मुलांना सांगितलं जातं. त्यामुळे त्या संबंधित विषयावर काही प्रश्न, शंका असतील त्यांचं निरासन केलं जातं. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयावरुन संवाद घडतो आणि त्याविषयी मार्गदर्शन मिळतं. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘माय महानगर‘शी बोलताना ही माहिती दिली.

“विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यासक्रम शिकवता यावा यासाठी ऐरोलीमध्ये एक सेंटर सुरु करण्यात आलं आहे. याठिकाणाहून २ तज्ज्ञ डॉक्टर देशातील १७ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना २ तास लेक्चर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल तरी त्यांना मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून एमबीबीएसचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळते.”  – डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

“गोदिंया, चंद्रपूर या ठिकाणी जर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर ती मुलं जाण्यास टाळाटाळ करतात. मात्र, आता लेक्चर सिरीजमधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून शिकवण्याची संधी मिळते. शिवाय, त्यांचं एकमेकांशी बोलणं होतं. मुलंही लेक्चरसाठी नियमीत अभ्यास करुन येतात. शंका- प्रश्न विचारले जातात. यामधूनच मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते.”  – केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे 

First Published on: July 31, 2018 5:50 PM
Exit mobile version