मेधा सोमय्या बदनामी प्रकरण, संजय राऊतांना जामीनपत्र वॉरंट

मेधा सोमय्या बदनामी प्रकरण, संजय राऊतांना जामीनपत्र वॉरंट

शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने जामीनपत्र वॉरन्ट बजावला आहे. यानुसार त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी शिवजी न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र, ते हजर राहिले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामिनपत्र वॉरंट जारी केला आहे. (Mumbai Sewree Court today issued Warrant against Shivsena Leader #SanjayRaut in Prof Dr Medha Kirit Somaiya Defamation Case)

हेही वाचामोठी बातमी! मेधा सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

संयज राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हेही वाचा मेधा सोमय्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स, किरीट सोमय्यांची माहिती

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. दावा ठोकल्यानंतर न्यायालायने ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स राऊतांना बजावण्यात आले होते.

मात्र, आजच्या सुनावणीत संजय राऊत हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आता जामिनपत्र वॉरन्ट जारी केले असून १८ जुलै रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ आणि १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचून आपल्याला धक्का बसला, असे मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटलं होतं. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये बदनामीकारक असून सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही मेधा यांनी केला आहे.

First Published on: July 4, 2022 2:42 PM
Exit mobile version