नाणार प्रकल्प आता रायगडमध्ये जाणार

नाणार प्रकल्प आता रायगडमध्ये जाणार

नाणार प्रकल्प

गेल्या कित्येक दिवसांपासून नाणार प्रकल्प हा कोकणातील संवेदनशील विषय बनला आहे. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ नये, यासाठी तेथील स्थानिक नागरिक आंदोलने करत आहे. नाणार प्रकल्पामुळे निसर्गाचा ऱ्हास होईल आणि कोकणातील वातावरण असंतुलित होऊ शकते. त्यामुळे तेथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हा नाणार प्रकल्प होणार होता. मात्र आता हा नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

रायगडच्या स्थानिकांचा विरोध नाही

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु, शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपाबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशेन सुरु असून यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तेल शुद्धीकरण प्रकल्पाला प्रस्तावित ठिकाणी अर्थात रायगड मध्ये स्थानिकांचा विरोध आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी तारांकित प्रश्नात विचारला होता. याप्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धनय चार तालुक्यातील ४० गावातील सुमारे १३ हजार ४०९ हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे. तसेच सिडकोच्या प्रस्तावानुसार या भागाला औद्योगिक विकासासाठी नवनगर क्षेत्र म्हणून सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यानी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

या विकास प्राधिकरणा अंतर्गत अधिसूचित जामिनीच्या भूसंपादनच्या अनुषंगाने भूमी अभिलेख जिल्हाधिका रायगड यांच्या कार्यालयाकडून सिडकोने कागदपत्र मागवण्यात आली होती. यात ४० गावातल्या ग्रामासस्थानी औद्योगिक प्रकल्पाला विरोध केल्याची बाब निदर्शनाला आली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. दरम्यान, मार्च अर्थसंकल्पिय अधिवेशनात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी नाणार मध्ये अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे भूसंपादन रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

ग्रामस्थांना कल्पना नाही

रायगडला रोहा परिसरात राज्य सरकारने इंडस्ट्रियल झोनसाठी जागा घेतली आहे. मात्र या जागेवर रिफायनरी येणार आहे की नाही याची ग्रामस्थांना कल्पना नाही. जमीन अधिग्रहनाचा पहिला टप्पा पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तराने रायगडकरांना धक्का बसला आहे. – उल्का महाजन, जनहरा आंदोलन प्रमुख


हेही वाचा – नाणार प्रकल्पामुळे निसर्गाची हानी – उद्धव ठाकरे

हेही वाचा – नाणार प्रकल्पाचा फायदा की तोटा? पहा डॉक्यूमेंटरी


First Published on: June 19, 2019 3:00 PM
Exit mobile version