शरद पवार असं का म्हणाले? – सेना-भाजपला ४५ नाही, ४८ जागा मिळतील!

शरद पवार असं का म्हणाले? – सेना-भाजपला ४५ नाही, ४८ जागा मिळतील!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

शिवसेना आणि भाजपमध्ये ऐतिहासिक वाद-विवाद आणि चर्चेच्या अनंत फेऱ्यांनंतर युती झाली आणि दोन्ही पक्षांमधल्या नाराजी नाट्याला सुरुवात झाली. एकीकडे दोन्ही पक्षनेत्यांना या नाराजी नाट्याला थोपवायचं कसं? असा प्रश्न पडलेला असतानाच समोरूम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधून शरद पवारांनी युतीवर थेट निशाणा साधला आहे. ‘शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेवेळी अमित शाह यांनी थोडी चूक केली. युतीला ४५ नाही तर ४८ जागा मिळतील’, असं शरद पवार म्हणाले आहेत. एरवी या वाक्यावरून शरद पवार हे काय बोलत आहेत? असा प्रश्न पडला असता. मात्र, पवारांनी मारलेला खोचक टोला सेना-भाजप नेतृत्त्वाला नक्कीच कळला असणार आणि त्यामुळे जिव्हारी लागला देखील असेल. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी आघाडीच्या पुढच्या वाटचालीविषयी, तसेच पवार घराण्यातल्या संभाव्य उमेदवारांविषयी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सेना-भाजप युतीला खोचक टोमणा हाणला.

‘त्यांना सत्तेची उब सोडवत नाही’

युतीची घोषणा करताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ‘राज्यात युतीला ४५ जागा मिळतील’, असा दावा केला होता. त्यांच्या याच दाव्याची शरद पवारांनी यावेळी बोलताना खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेना आणि भाजप या दोघांनाही सत्तेची उब सोडवत नाही’, असं देखील पवार यावेळी म्हणाले. १८ फेब्रुवारीला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सेना-भाजप युती करत असल्याचं जाहीर केलं. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजप २५ जागा लढवणार असून विधानसभेसाठी घटकपक्षांना जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या वाटून घेणार असल्याचं यावेळी दोन्ही पक्षांनी सांगितलं.


हे तुम्ही वाचलंत का? – शिवसेना कार्यकर्ते किरीट सोमय्यांविरोधात प्रचार करणार!

युती विरोधकांच्या पथ्यावरच?

दरम्यान, शिवसेना-भाजप युती विरोधतांच्या पथ्थ्यावरच पडण्याची शक्यता यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली. ‘युती नसती झाली, तर भाजपविरोधी मतं शिवसेनेला मिळाली असती. पण आता ती मतं काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील’, असा आडाखा यावेळी पवारांनी मांडला.

First Published on: February 19, 2019 8:04 PM
Exit mobile version