शिवसेना कार्यकर्ते किरीट सोमय्यांविरोधात प्रचार करणार!

एकीकडे भाजप आणि शिवसेनेचे पक्षनेतृत्व संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये 'तुझ्या गळा, माझ्या गळा' करत असतानाच कार्यकर्ते मंडळी मात्र एकमेकांना त्याच गळ्याला धरून खाली खेचण्याच्या तयारीत आहे.

Kirit Somaiya

मुंबई महानगर पालिका निवडणुकीवेळी शिवसेना विशेषत: उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणाऱ्या भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी युतीनंतर वाढण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे युती झाली असली तरी किरीट सोमय्यांना कोणताही शिवसैनिक मदत करणार नसल्याची भूमिक शिवसैनिकांनी घेतली आहे. ‘जर भारतीय जनता पार्टी इशान्य मुंबईतून किरीट सोमय्या उमेदवार म्हणून माथी मारत असेल तर नोटाचा वापर करून किरीट सोमय्या यांना पाडणार’, असा इशारा नाराज शिवसैनिकांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिला आहे.


हेही वाचा – खोतकरांना उमेदवारी द्या, अन्यथा दानवेंना मदत करणार नाहीत

आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमची भूमिका मांडली असून, आम्ही किरीट सोमय्या यांना पाडणार. आमचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर या माणसाने खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात काम करू. तसेच आम्ही नोटाचा वापर करून नोटाचा विजय करू.

राजेंद्र राऊत, शिवसेना विभागप्रमुख

घरोघरी करणार सोमय्यांविरोधात प्रचार!

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसैनिक नुसता ‘नोटा’चा वापर करणार नाही, तर किरीट सोमय्या यांच्याविरोधात मतदारसंघात जाऊन घरोघरी प्रचारदेखील करणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. ‘जरी किरीट सोमय्या उमेदवार म्हणून दिले गेले आणि वरून देखील आदेश आले तरी आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार. ज्या किरीट सोमय्यांनी योग्यता नसताना मातोश्रीवर टीका केली त्या किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर जाऊन जाहीर माफी मागावी’, अशी मागणी देखील या संतप्त शिवसैनिकांनी केली आहे. युती तुटल्यावर सर्वाधिक टीका करून युतीत दरी निर्माण करणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांवर शिवसैनिक नाराज आहेत. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात मुलुंडमध्ये किरीट सोमय्या यांच्या अंगावर शिवसैनिक धावून गेले होते. तेव्हा पासूनच किरीट सोमय्या यांना पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

म्हणून शिवसैनिक सोमय्यांवर नाराज

पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेवर शाब्दिक टीका करण्यामध्ये भाजप खासदार किरीट सोमय्या नेहमीच आघाडीवर होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी तर शिवसेनेला ‘माफिया’ असे संबोधले होते आणि हीच टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली असून, किरीट सोमय्या यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आतुर झाला आहे.


वाचा राणे काय म्हणतायत – जनतेसाठी नाही, तर स्वार्थासाठी युती केली

म्हणून सोमय्या पत्रकार परिषद सोडून निघाले

सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यावेळी मुंबईतले भाजपाचे सर्व खासदार उपस्थित होते. मात्र किरीट सोमय्या यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी पाहता पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच सोमय्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, किरीट सोमय्या यांना विचारले असता त्यांनी या सर्व विषयावर मौन बाळगणे पसंत केले असून, ‘मी सध्या जास्त बोलण्यापेक्षा मतदारसंघात मतदारांची कामे करतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.