दंगली घडवणारे खरे मास्टरमाइंड हे कलानगरमध्ये, नितेश राणेंचा हल्लाबोल

दंगली घडवणारे खरे मास्टरमाइंड हे कलानगरमध्ये, नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray

महाराष्ट्रात दंगलींच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमधील वादावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दंगली घडवणारे खरे मास्टरमाइंड हे कलानगरमध्ये बसले असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा आरोप आमच्यावर केला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर केला जातोय. मी १३ ऑगस्ट २००४ मधलं बोलत असून त्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून आक्षेप घेतला जात नाहीये. माझ्यावर कितीही टीका करा. पण दंगली घडवणारा मास्टरमाइंड हा कलानगरमध्ये बसला असून त्यांची चौकशी आणि नार्कोटेस्ट झालीच पाहिजे, हे मी वारंवार बोलत आहे, असं नितेश राणे म्हणाले.

माजी सरचिटणीस अरूण बेतकेकर हे स्वत: उद्धव ठाकरे आणि खासदारांसोबत बैठकीला उपस्थित होते. अरूण बेतकेकर हे ऑन रेकॉर्डवर यायला तयार आहेत. उद्धव ठाकरेंनी सत्ता आणण्यासाठी राज्यात दंगली घडवण्याचा कसा प्लॅन रचला, यावर चौकशी झाली पाहिजे. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचा दंगली घडवणारा महाविद्यालयीन कुलगुरू मातोश्रीवर बसला असून त्यांना बोलकं करा. महाराष्ट्रात होणाऱ्या दंगलीमध्ये उद्धव ठाकरेंचा काय हात आहे, याबाबत त्यांनी उत्तर द्यावं, असंही राणे म्हणाले.

राऊत सध्या मुस्लिम समाजाच्या प्रेमात

बारा ज्योतिर्लिंगमध्ये त्र्यंबक एक महत्त्वाचं स्थान आहे. परंतु त्याठिकाणी धूप करण्यासाठी जमण्यात आल्याचं मुस्लिम लीगचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं. पण माझ्याकडे त्या मंदिराच्या ट्रस्टचं एक पत्र आहे. त्या ट्रस्टने या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांना लिहिलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला, असं पत्रात म्हणण्यात आलं आहे. कोणाला तिथे धूप करायची असेल तर हट्ट का करावा?, चादर घालण्याचा हट्टाहास करून ते लोकं तिथे आले होते. हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला समजलं नसेल. संजय राऊत हे मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.


हेही वाचा : राऊत सध्या मुस्लिम समाजाच्या प्रेमात, नितेश राणेंची टीका


 

First Published on: May 17, 2023 11:31 AM
Exit mobile version