राहुल गांधी हे अहंकारी…, भाजपा नेते निलेश राणे यांचे टीकास्त्र

राहुल गांधी हे अहंकारी…, भाजपा नेते निलेश राणे यांचे टीकास्त्र

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल, शुक्रवारी रद्द केली. त्यावरून सर्व थरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असतानाच, राहुल गांधी हे अहंकारी असल्याची टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे.

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजपाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन सुरत न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तथापि, राहुल गांधी यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला आणि या निर्णयाविरुद्ध अपील करता यावे यासाठी त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली.

त्यापाठोपाठ लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 8 अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकसभा सचिवालयाने याबाबत नोटीस जारी करत लोकसभेच्या वेबसाइटवरूनही राहुल गांधी यांचे नाव हटवले. या निर्णयाविरोधात काँग्रेसने सोमवारपासून संविधान वाचवा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे अहंकारी आहेत. काँग्रेसमध्ये असताना हे आम्ही जवळून पाहिले. मी गांधी आहे, काही करू शकतो, काही बोलू शकतो, हा गैरसमज राहुल गांधींमधून जात नाही. ते खासदार म्हणून कधी वागलेच नाहीत. खासदारकीचा वापर फक्त सभागृह बंद पाडण्यासाठी केला, देशासाठी नाही. मग खासदारकी गेली त्यात दुःख कसलं? असा सवाल त्यांनी केला आहे.

First Published on: March 25, 2023 10:12 AM
Exit mobile version