MNS GudhiPadwa Rally : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, भाजपवर मात्र मौन

MNS GudhiPadwa Rally : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, भाजपवर मात्र मौन

राज ठाकरे पाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर बरसले

मुंबई – गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शिवसेना (Shivsena) का सोडली याचाही गौप्यस्फोट पाडवा मेळाव्यात केला. यावेळी त्यांनी भावनिक होत शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, असं म्हणत प्रथमच शिवसेना का सोडावी लागली आणि कोणामुळे सोडावी लागली हे जाहीररित्या सांगिले आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपबद्दल मात्र मौन (silence on BJP) बाळगले.

पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सूकता लागून राहिली होती. शिवसेनेत झालेली बंडाळी. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार यावरुन झालेला वाद आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय. भोंग्यांवरुन मनसेने केलेल आंदोलन. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई. एकनाथ शिंदेना मिळालेले मुख्यमंत्रीपद. यापैकी राज ठाकरे कशावर बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती. यापैकी राज यांनी शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला.

हेही वाचा : शिवधनुष्य एकला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही; राज ठाकरेंचा उद्धव, एकनाथ शिंदेंना टोला

राज ठाकरे म्हणाले, ‘पक्ष स्थापनेच्या वेळेस, खरंतर मी शिवसेना का सोडली ह्यावर बोललो असतो. पण मी बोललो नाही. शिवसेना सोडताना ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. साफ झूट.’ मनसे स्थापनेच्या १७ वर्षानंतर राज यांनी शिवसेना सोडण्यामागेच कारण पाडवा मेळाव्यात सांगितले.
ते म्हणाले, ‘शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे सांगतोय, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना ओबेरॉय हॉटेलमध्ये समोरासमोर बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग.’
राज ठाकरेंनी २००३ साली घडलेल्या घटना पाडवा मेळाव्यात जाहीररित्या सांगितल्या, ते म्हणाले, ‘मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका. उद्धव म्हणाले की मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव ना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धवना शिवसेनेत आम्ही नको होतो.’

हेही वाचा : मशिदीवरील भोंगे एक महिन्यात हटवा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं त्याने मला त्रास झाला, असं सांगतानाच राज ठाकरे म्हणाले, ‘मला बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा नव्हता, माझी कसलीच महत्वकांक्षा नव्हती. पण मला पक्ष सोडण्यासाठी वातावरण तयार करण्यात आले.’
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. त्याचाही किस्सा राज यांनी या मेळाव्यात सांगितला. ते म्हणाले, ‘मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही.’
बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘२०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं. आणि अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं. अमित शाह ह्यांनी चार भिंतीत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांचे नाव प्रत्येक सभेत जाहीर करत होते, तेंव्हा का नाही आक्षेप घेतलात? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. आपल्याशिवाय सत्ता बसत नाही बघून मुख्यमंत्रीपदाची मागणी काढली, असा टोला त्यांनी उद्धव यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा : मुंबई आहे की डान्स बार, तेच कळत नाही; सुशोभीकरणावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते, आमदारांना भेटायचे नाहीत. कोविड काळात हे कोणाला भेटायला तयार नाही. एक आमदार त्याच्या मुलासह भेटायला गेला तर यांनी मुलाला बाहेर बसायला सांगितलं. आमदार भेटल्यानं कोरोना होत नाही आणि मुलगा सोबत असता तर काय कोरोना झाला असता का, असा खोचक सवाल राज यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आमदारांची कामं होत नव्हती म्हणून मग ४० आमदार कंटाळून सोडून गेले. असाही आरोप राज यांनी केला.

हेही वाचा : ‘मी उद्धवला म्हटलं चल माझ्यासोबत….’ राज ठाकरेंनी सांगितला २००३ चा प्रसंग

सव्वा तासांच्या राज ठाकरेंच्या भाषणात त्यांचा संपूर्ण रोख हा उद्धव ठाकरे यांच्यावरच होता. उद्धव आणि त्यांच्या जवळच्या लोकांमुळेच शिवसेना संपली असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र राज ठाकरे यांनी यावेळी भाजपवर मौन बाळगले. केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवायांवरही ते काहीही बोलले नाही.

First Published on: March 22, 2023 10:43 PM
Exit mobile version