मनी लाँड्रिंगप्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर, पण…

मनी लाँड्रिंगप्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर, पण…

मुंबई – मनी लाँड्रिंगप्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze in Mmoney Laundering case) याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन (Grant Bail) मंजूर केला आहे. ईडीच्या प्रकरणातून त्याला जामीन मिळाला असला तरीही इतर प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी आहे, त्यामुळे तो तुरुंगातच राहणार आहे. (Bail Granted to Sachin Vaze in Mmoney Laundering case)

सचिन वाझेने सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत जामीन अर्ज केला होता. मात्र, त्याला जामीन दिल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असं ईडीने न्यायालयात म्हटलं होतं. मात्र, तरीही मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून निर्णय घेतला आहे. वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे.

हेही वाचा -सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

सचिन वाझे माफीचा साक्षीदार

कोरोना काळात १०० कोटी रुपये वसुली गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. अनिल देशमुख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात सचिन वाझेंनासुद्धा अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांनी आपल्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचे सचिन वाझेंनी चौकशीमध्ये कबुल केलं होतं. तसेच या प्रकरणात त्याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता. सीबीआयनेही त्याच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर सही केली होती.

हेही वाचा – मी माफीचा साक्षीदार, आता नेमकं काय करायचं?, सचिन वाझेंचा कोर्टात प्रश्न

…तरीही राहणार तुरुंगातच

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्याच परिसरात बेवारस स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. दरम्यान, या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांचाही अचानक मृत्यू झाला होता. या सर्व प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्याचा सहकारी रियाझ काझी, पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तर, दुसरीकडे सचिन वाझे, अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिगप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. तर, याचप्रकरणात सीबीआयचीही चौकशी सुरू होती. त्यामुळे सचिन वाझे यांना सध्या जामीन मिळाला असला तरीही इतर प्रकरणातून त्यांना जामीन मिळाला नसल्याने त्यांची तुरुंगवारी अटळ आहे.

First Published on: November 18, 2022 3:59 PM
Exit mobile version