समयसूचकतेमुळे वाचले सागर भायदे कुटुंब

समयसूचकतेमुळे वाचले सागर भायदे कुटुंब

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनाची दोरी मोठी असेल तर कितीही संकट आले तरी त्यातून मनुष्य हा सुखरूप बाहेर पडतो. पनवेल येथील सागर भायदे यांच्या कुटुंबाने हा थरारक अनुभव घेतला आहे. हे कुटुंब मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आले आहे.

मुरुड अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल दुर्घटनेतून भायदे कुटुंब हे आपल्या हुशारीमुळे आपला स्वतःचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहे. या दुर्घटनेत मृत झालेले विजय चव्हाण याला वाचविण्याचा प्रयत्न मात्र भायदे अयशस्वी ठरले. भायदे कुटुंबाची वेळ आली होती; पण काळ आला नव्हता. त्या क्षणाची आठवण झाली तरी भायदे यांच्या अंगावर काटा उभा राहतो, अशी प्रतिक्रिया सागर भायदे यांनी दिली. या दुर्घटनेत विजय चव्हाण या मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचविण्याचा प्रयत्न सागर भायदे यांनी केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला.

पनवेल येथे राहणारे सागर भायदे (वय ४०) हे आपली पत्नी शोभा भायदे (वय ३८), श्री भायदे (वय ९), नील भायदे (वय ४, या आपल्या दोन मुलांसह आणि उजिता पिपले (वय ३८), पुष्पा सकपाळ (वय ३८) यांच्यासह ११ जुलै रोजी मुरुड तालुक्यातील दांडा येथे आपल्या नातेवाईकांकडे कारने आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने पनवेलकडे जाण्यास निघाले. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर पाणीच पाणी, त्यात काळोख आणि वरून मुसळधार कोसळणारा पाऊस अशा कठिण परिस्थितीत ते निघाले होते. मात्र, पुढे आपले मरण वाढून ठेवले आहे, याची सुतराम कल्पना भायदे कुटुंबाला नव्हती. मुसळधार पावसामुळे मुरुड अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल वाहून गेला होता. याबाबत भायदे यांना काहीच कल्पना नव्हती.

काशीद पूल वाहून गेल्याने भायदे यांची कार पुलावरून खाली वाहत्या पाण्यात पडली. आपले मरण समोर पाहून भायदे कुटुंब भयभीत झाले. डोंगरातून समुद्राकडे जाणार्‍या पाण्याला जोरही होता. यात भायदे कुटुंबाची कार बाजूच्या झाडाला अडकली. कार खाली पडताना मागच्या काचेला तडे गेले होते. याचा फायदा घेऊन भायदे यांच्या मुलाने हाताने काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वयाच्या मानाने ते कठिण जात होते. अशा परिस्थितीतही श्रीने हुशारी दाखवून डोक्याला टेकणारी सीट काढून काच फोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काच फुटली.

काच फोडल्यानंतर सागर भायदे यांनी मुलांना व इतरांना बाहेर काढून बाजूच्या झाडाचा आधार घेतला. ‘वाचवा वाचवा’ म्हणून ओरडू लागले. मात्र, कोणालाही आवाज येत नव्हता. भायदे यांच्या पत्नीकडे असलेल्या फोनवरून मुरुडचे माजी नगरसेवक संदीप पाटील यांना फोन करून घडलेला प्रसंग सांगितला.

संदीप पाटील यांनी त्वरित बारशिव येथील निलेश घाटवळ यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्वरित घाटवळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी सागर भायदे यांनी आपल्या मुलांना खांद्यावर चढवून रस्त्यावर ढकलले. त्यानंतर मुलांनी उपस्थित ग्रामस्थांना जाऊन माझे आई-वडील पाण्यात अडकले असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत भायदे यांचा चार वर्षांचा मुलगा, पत्नी आणि पत्नीची मैत्रिण उजिता पिपले जखमी झाल्या. या सर्वांना घाटवळ यांनी बोर्ली येथील खासगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले.

First Published on: July 12, 2021 11:56 PM
Exit mobile version