सिढिया चढते हुए जो, उतरना भूल जाते है.., संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

सिढिया चढते हुए जो, उतरना भूल जाते है.., संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार, माजी नगरसेवक यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता अॅक्शन मोडमध्ये दिसून असून अनेक बैठका घेत आहे. शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर ११ जुलै रोजी सुनावणी पार पडणार होती. परंतु कोर्टाने यावर तातडीने सुनावणी करता येणार नाही, असं स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या २० जुलै रोजी शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिंदे गटावर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

सिढिया चढते हुए जो,उतरना भूल जाते है..वे घर नहीं लौट पाते…नरेंद्र सक्सेना, असं ट्विट करत संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. त्यांच्यासोबत न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाने आव्हान दिलं आहे. तर शिंदे सरकार स्थापनेचे निमंत्रण देणाऱ्या राज्यपालांना आव्हान देण्यात आलं आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून अजय चौधरींची नियुक्ती रद्द करणे, या सर्व याचिकेंवर सुनावणी होणार आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे आता पुढील चार याचिकांवर २० जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :नागपुरच्या खासगी शाळेत तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; पालकांमध्ये भीतीचे वातावरण


 

First Published on: July 18, 2022 8:58 AM
Exit mobile version