Sharad Pawar : अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं, नाराजीचा प्रश्नच नाही – शरद पवार

Sharad Pawar : अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं, नाराजीचा प्रश्नच नाही – शरद पवार

संग्रहित छायाचित्र

जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली, कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जबाबदारी नव्हती. तसेच त्यांची निवड वरिष्ठ नेतेमंडळींकडून करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर कुणीही नाराज नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं.

अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.पुढील पक्षाध्यक्ष कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर शरद पवार म्हणाले की, लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आहे. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता. अजित पवारांनीच सुप्रिया सुळे यांचं नाव सुचवलं होतं. सध्या पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही. जेव्हा खाली होईल तेव्हा बघू. परंतु अजित पवार नाराज असल्याची बातमी खरी नाही, असं शरद पवार म्हणाले.

२३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा

चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. महिन्यात ४ वेळा इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. २३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा आहे. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना एकत्र आणणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

दिल्लीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवर भाकरी फिरवत पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोघांचीही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यावेळी सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगानंद शास्त्री, के.के. शर्मा, फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी देण्यात आली नाही. परंतु या निर्णयानंतर अजित पवार हे नाराज नाहीत, याबाबतचा खुलासा पवारांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.


हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे NCPने नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष, शरद पवारांनी स्वतःच सांगितले


 

First Published on: June 10, 2023 5:50 PM
Exit mobile version