तेलही गेले, तूपही गेले; शिंदे गटाला मंत्रिमंडळाबरोबर महामंडळातही कमी वाटा?

तेलही गेले, तूपही गेले; शिंदे गटाला मंत्रिमंडळाबरोबर महामंडळातही कमी वाटा?

मुंबई – राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडले आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात शिंदे गटातील अनेक आमदारांना संधी न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळातही त्यांना घेता येणार नसल्याने त्यांची वर्णी महामंडळांवर करण्यात येणार आहे. परंतु, यामध्येही भाजपाच्याच नेत्यांना सर्वाधिक महामंडळे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळही गेलं आणि महामंडळ गेलं अशी परिस्थिती शिंदे गटातील आमदारांची झाली आहे.

१२० महामंडळांपैकी ६० महामंडळांचे वाटप पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. यापैकी ३६ महामंडळे भाजपाच्या वाट्याला येणार असून फक्त २४ महामंडळे शिंदे गटाच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत फारकत घेऊन तेलही गेले आणि तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा – मंत्र्यांनी केला बेळगाव दौरा रद्द, पवारांच्या आंदोलनाचा दाखला देत सुप्रिया सुळेंचा चिमटा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये शिंदे गटाचे आमदार कमी असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून भाजपाने स्वतःला उपमुख्यमंत्री पद घेतले. मात्र, मंत्रिमंडळ आणि महामंडळात भाजपाने स्वतःकडे ज्यादा जागा घेतल्या आहेत. नुकत्याच, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत भाजपा ६० टक्के आणि शिंदे गटाला ४० टक्के महामंडळे देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यामुळे शिंदे गटातील नाराजी आता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपाच्या आमदारांना सर्वाधिक संधी मिळणार आहे.

हेही वाचा – राज्यघटना चुकीच्या लोकांच्या हाती, शिवसेनेचा रोख कोणावर?

विधान परिषदेवर पाठवा

विधान परिषदेच्या सहा आमदारांची मुदत ५ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. या रिक्त झालेल्या जागांवर आम्हाला प्राधान्य द्या, अशी मागणी आता शिंदे गटाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे अनिल भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था), कॉंग्रेसचे मोहन कदम (सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था), अमरनाथ राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था), शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), दुश्यंत चतुर्वेदी (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि भाजपचे चंदुभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था) डॉ. परिणय फुके (भंडारा – गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था) यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ संपला आहे. या रिक्त जागांवर शिंदे गटाचा डोळा आहे.

First Published on: December 6, 2022 10:27 AM
Exit mobile version