नोटांवरील फोटोच्या वादात शिवसेनेची उडी, हा मोदी-भाजपचा ट्रॅप; सुषमा अंधारे स्पष्टच बोल

नोटांवरील फोटोच्या वादात शिवसेनेची उडी, हा मोदी-भाजपचा ट्रॅप; सुषमा अंधारे स्पष्टच बोल

सध्या चलनी नोटांवरील फोटोवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. या नोटांच्या मुद्द्यावरील वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. नोटांवरील फोटोबाबत सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत. दरम्यान या नोटांवरील फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा ट्रॅप असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. या सापळ्यात अडकण्यापेक्षा देशाच्या चलनाची घसरलेली पत कशी सुधारेल याचे उत्तर मोदी आणि केजरीवालांना विचारावे असही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. (shivsena leader sushma andhare said controversy over currency notes photo is trap by bjp)

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, नोटांवर गणपती आणि सरस्वतीचा फोटो हवा अशी केजरीवाल यांच्यासारख्या अधिकारी राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी करणे खरेच आश्चर्यकारक आहे. यातून केजरीवालांना पंतप्रधान मोदींची हिंदुत्वाची लाईन पुढे ओढायची का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही देशाच्या चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा याचा एक इतिहास असतो, त्याला अनुसरून हे फोटो असतात. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असल्याने त्यांचे फोटो नोटांवर येतात. मात्र देवी देवतांच्या फोटोंबाबत आग्रह धरणारे आणि विरोध करणाऱ्यांनी धार्मिक अंगाने विचार न करता आर्थिक इतिहास पाहावा, असा सल्ला अंधारेंनी दिला आहे.

नोटांवर कोणाचा फोटो असावा यापेक्षा भारतीय चलनाची प्रतिष्ठा कशी सुधारेल याचा विचार महत्वाचा आहे. धर्मनिरपेक्ष देशात विविध धर्मात फूट पाडण्याचे भाजपचे द्वेषमूलक राजकारण यशस्वी होईल, असे सांगताना आपण यात फसता कामा नये असा सल्लाही त्यांनी दिला. अशा वादात सर्व धर्म एकमेकांत भांडत बसले तर देशापुढील सर्व महत्त्वाचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मागे राहतील, मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा वाद सुरु असल्याचा दावाही अंधारेंनी केला आहे.

मनमोहन सिंग यांच्या काळात देशाचा जीडीपी 8 टक्क्यांवर गेला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी हा विकास दर 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचे दर्पोक्ती केली. आता तोच जीडीपी 2.45 टक्क्यांपेक्षा कमी कसा झाला. या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला सतत प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचेही अंधारे म्हणाल्या आहेत.


छत्रपती शिवरायांपासून ते मोदींपर्यंत, नोटांवर कोणाचा फोटो हवा? नेत्यांकडून सूचनांचा पाऊस

First Published on: October 27, 2022 4:11 PM
Exit mobile version