मराठा आरक्षणासाठी ‘या’ आमदारानं उभारली ‘लिगल टीम’

आरक्षणासाठी आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतले आहे. मराठा आमदारांनी देखील आता सिर सलामत तो पगडी पचास म्हणत आमदारकीचा राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर पहिल्यांदा राजीनामा दिला तो शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जाधव यांना आता लिगल सेलची नेमणूक केली आहे. अभिनसिंग भोसले आणि प्रियंका राणे-पाटील असे या वकीलांची नावे आहेत. इंदिरा सहानी यांच्या निर्णयाप्रमाणे तामिळनाडूमध्ये आरक्षण दिले गेले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी या लिगल सेलने केली आहे. केंद्र सरकारला याबाबत एक प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे असे देखील हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

मराठयांना आरक्षण शक्य?

आरक्षणाचा विषय हा शेड्यूल ९ मध्ये समावेश करण्यात यावा. मराठा आरक्षण शेड्यूल 9 मध्ये समावेश केल्यास त्याला स्टे मिळाल्यानंतर देखील त्याची तात्पुरती अंमलबजावणी करणं शक्य असल्याचं वकील अभिनसिंग भोसले आणि वकील प्रियंका राणे-पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सरकार जर आरक्षणाच्या मागणीवर भूमिका घेत नसेल तर सर्वपक्षीय आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत असे आवाहन देखील हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. तसेच नारायण राणे समितीने केवळ ५५ सँपल घेतले होते. मराठा समाज मोठा असताना केवळ ५५ सँपल का घेतले? असा सवाल देखील यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. तर, मराठा आरक्षणासाठी कोण मध्यस्ती करतंय हे महत्त्वाचे नाही. आता परमेश्वर जरी आला तरी काहीही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया जाधव यांनी ‘माय महानगर’कडे दिले आहेत. दरम्यान, कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी जाधव यांनी केली.

‘बाळासाहेब बोलले ते योग्यच’

बाळासाहेब ठाकरेंनी आर्थिक निकषावर केलेली आरक्षणाची मागणी योग्य आहे. पण सत्ता जाईल किंवा त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल म्हणून कुणीही या गोष्टीचा विचार करत नसल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली. सरकारने लवकर अद्यादेश काढावा. तसेच जेलभरो आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होणार आहे अशी माहिती देखील जाधव यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी दिपक केसरकरांवर टीकास्त्र टाकले. महाराष्ट्र पेटत असताना दिपक केसरकरांसारखे मंत्री कशाला हवेत? असा सवाल त्यांनी केला. दिपक केसरकर आमच्या पक्षाचे असले तरी टिपिकल पॉलिटीकल आहेत. बाळासाहेब असते तर त्यांनी दिपक केसरकारांना केव्हाच काढून टाकले असते अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी दिपक केसरकर यांना लक्ष्य केले आहे.

मराठ्यांना आवाहन

दरम्यान, मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये, हिंसाचार करू नये. जो हिंसाचार करेल तो मराठा समाजाच्या पोटचा नाहीत. आपण बदनाम होतोय हे थांबवा असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

 

वाचा – मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत?

वाचा – मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवणार – मुख्यमंत्री

वाचा – मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे आमदार देणार राजीनामा

वाचा – केसरकरांना गांर्भियाची जाणीव असायला हवी – हर्षवर्धन जाधव

First Published on: July 31, 2018 3:42 PM
Exit mobile version