घाणेरडे आरोप विरोधी पक्षाने करु नयेत; ऑक्सिजन प्लँटच्या आरोपांवरुन राऊतांची टीका

घाणेरडे आरोप विरोधी पक्षाने करु नयेत; ऑक्सिजन प्लँटच्या आरोपांवरुन राऊतांची टीका

ऑक्सिजन प्लँटच्या आरोपांवरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. घाणेरडे आरोप विरोधी पक्षांनी करु नयेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. रविवारी भाजपने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंडातून निधी दिला. मात्र, हा निधी खाऊन टाकला असा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

ऑक्सिजन प्लँट उभारले नसल्यामुळे नागरिकांचा जीव गेला हा आरोप महाराष्ट्रा सरकारवर असेल तर पूर्णपणे चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आहे. ऑक्सिजनमुळे इथे कोणाचा मृत्यू झालेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रीमंडळ आणि संपूर्ण सरकार ऑक्सिजन मिळावा, व्हेंटीलेटर्स मिळावा यासाठी रोज लढाई करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी राज्य सरकारवर करु नयेत. त्यांनी खरं तर राज्य सरकारला चांगले सल्ले द्यावेत. सरकार नक्किच पालन करेल, असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही

सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली महाराष्ट्राची परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही. महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मोफत लसीकरण हा सरकारचा निर्णय

संजय राऊत यांनी मोफत लसीकरणावरही भाष्य केलं. मोफत लसीकरण हा सरकारचा विषय आहे. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे, असं राऊत म्हणाले.

 

First Published on: April 26, 2021 10:30 AM
Exit mobile version