सेनेचे हाजी अराफत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सेनेचे हाजी अराफत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

हाजी अराफात शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश (सौजन्य-ट्वीटर)

सेना वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी अराफत शेख यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११ वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. मात्र, ही वर्णी सेना नाही तर भाजपकडून लावण्यात आल्याची माहिती आता उघड झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी शेख यांची उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी सुरु होती. मात्र, शिवसेनेकडून उपाध्यक्षपदी जगन्नाथ अभ्यंकर यांची नेमणूक झाली. अशावेळी शेख यांची भाजपकडून आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय ठरतो आहे.

सौजन्य- आशिष शेलार, ट्वीटर

शिवसेनेत होता राजकीय तणाव

सूत्रांनुसार, अरफत शेख आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात राजकीय तणाव निर्माण झाला होता. शेख यांचे कार्यकर्ते सांगतात की रमजानच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेख यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यानंतर हाजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक खटकल्यामुे, शिवसेनेच्या नेत्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण मागितलं होतं. मुख्यमंत्रींबरोबरच्या वाढत्या भेटीबद्दल शिवसेनेच्या नेत्यांच्या भावना दुखावल्या होत्या. यामुळे सेनेतील नेते आणि शेख यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

उद्धव ठाकरेंकडे मुस्काटदाबीची तक्रार

दरम्यान याबाबत शेख यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. तसंच शिव वाहतुक सेनेत काम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नसल्याचंही शेख यांनी उध्दव ठाकरेंच्या कानावर घालतं होतं. तसंच शिवसेना नेते दिवाकर रावते आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत नसल्याची टीकाही, शेख यांनी एका कार्यक्रमात केली होती. शेख यांनी शिवसेनेमधल्या त्यांच्या मुस्काटदाबीवषयी देखील आपले मत उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केले होते.

याआधी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी वाद झाल्यामुळे हाजी शेख सेना सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, त्यावेळी हे प्रकरण थोडक्यात मिटल्यामुळे शेख सेना सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. सर्वात आधी ‘मनसे’ पक्षात असलेले हाजी शेख मनसे सोडून शिवसेनेत गेले. आता शेख यांनी सेनेलाही रामराम केला असून भाजपमध्ये प्रेवश केला आहे.
First Published on: September 2, 2018 1:29 PM
Exit mobile version