…तर राणेंना भाजपमध्ये प्रवेश नाही, सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांची भूमिका

…तर राणेंना भाजपमध्ये प्रवेश नाही, सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांची भूमिका

माजी मुख्यमंत्री नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? अशी चर्चा सुरू असताना आता कोकणातून भाजप पदाधिकारी राणेंना विरोध करत आहेत. भाजपचे नेते आणि कणकवली मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संदेश पारकर यांनी नारायण राणे हे आता राज्यस्तरीय नेते राहिले नसून ते फक्त कणकवली पुरतेच मर्यादित राहिल्याची टीका पारकर यांनी केली आहे. तसेच नारायण राणे हे स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या येण्याने भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. तर राणेंचाच वैयक्तिक फायदा होणार आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये घेणार नाही, असे संदेश पारकर यावेळी म्हणालेत.

आणखी काय म्हणाले पारकर

“लोकसभा निकालाचे चित्र पाहता येथे भाजपचा उमेदवारच निवडून येणार आहे. दुसरीकडे राणेंचा सातत्याने पराभव होत आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असे सांगून कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच राणे हे आता राज्यस्तरीय नेते राहिलेले नाहीत. तर कणकवली पुरतेच मर्यादीत राहिले आहेत. त्यांनी राजकारणात स्वतःचा आणि कुटुंबाचाच फायदा पहिला तर कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले आहे. राणेंचे आजवरचे राजकारण गुंडगिरीचे राहिले. आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी गुंड बनविले. गुंडगिरी ही भाजपची परंपरा नाही. त्यामुळे राणेंच्या प्रवेशाला आमचा तीव्र विरोध आहे. तसेच पक्षनेतृत्व देखील राणेंना भाजपमध्ये घेणार नाही.”, असे पारकर म्हणाले आहेत.

First Published on: September 20, 2019 6:47 PM
Exit mobile version