मला फडणवीसांची कीव येते, कारण…; संजय राऊतांचा खोचक टोला

मला फडणवीसांची कीव येते, कारण…; संजय राऊतांचा खोचक टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुनच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. तसचं. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. ( Thackeray Group leader Sanjay Raut Criticized DCM Devendra Fadnavis )

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हायकमांड दिल्लीत आहेत. मुख्यमंत्रीही दिल्लीत हेलपाटे मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहे ती माहिती नाही. पूर्वी ते आमच्यासोबत असताना उत्तम विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. काल पाहिलं ते फुटलेल्या गटाची गाडी चालवत होते, त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, हे पाहावं लागेल, असा चिमटा काढतानाच फडणवीस हा फार चांगला माणूस आहे. मला त्यांची दया येते. कीव येते. त्यांना देवाने लवकरच या संकटातून सोडवावं ही प्रार्थना करतो, असा टोलाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

अर्बन नक्षलवाद वाढत असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तेच मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल उसळली. तेव्हावी हाच अर्बन नक्षलवादाचा आरोप केला होता. तरीही तुम्ही अजून अर्बन नक्षलवाद मोडून काढू शकला नाही. हे तुमचं अपयश आहे. अर्बन नक्षलवाद हा तुमच्या सरकारविरोधातील बंड आहे, असं संजय राऊत म्हणाले.

( हेही वाचा: फुटलेल्या गटातही दोन गट, शिंदे गटात नाराजी; कीर्तिकरांच्या त्या वक्तव्यावरून राऊतांचा मोठा दावा )

तुम्ही रोजगार दिला नाही. तुमचं सरकार शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारावर काम करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहेत. नक्षलवादाचा विचार समजून घ्या. तेलतुंबडे प्रकरणात कोर्टाने काय सांगितलं? वरवरा राव प्रकरणात काय सांगितलं? याचा विचार तुम्ही करा. खोट्या प्रकरणात तुम्ही लोकांना अडकवून त्यांना दहशतवादी आणि आर्थिक दहशतवादी ठरवत आहात, अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.

First Published on: May 27, 2023 11:31 AM
Exit mobile version