आज शरद पवार होणार ईडी कार्यालयात दाखल

आज शरद पवार होणार ईडी कार्यालयात दाखल

शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी ट्विट करत ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे. आज (दि. २७ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता शरद पवार मुंबईस्थित ईडी कार्यालयात जाऊन तेथील अधिकार्‍यांचा पाहुणचार स्वीकारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला, अशी बातमी आल्यानंतर काल राज्यभरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यात आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको, निदर्शने करण्यात आली होती. तसेच मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन देखील केले. त्यामुळे पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत.

पवारांवर खोटे आरोप करणं चुकीचं!

शिखर बँक घोटाळा प्रकरणात माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नाही. त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करणं चुकीचं आहे. निर्दोष लोकांना विनाकारण अडकवलं जाऊ नये. त्यापेक्षा मी पुरावे सादर केल्यानंतर देखील त्यावर काहीही कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करायला हवेत. या सगळ्या प्रकाराच्या सखोल चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे.

अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

ईडी कार्यालय परिसरात गर्दी करु नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता राखावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासहीत आजी-माजी ७० संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या निर्णयाचे स्वागत केले.

मी कधीही कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो. तरिही ईडीला माझ्याशी काही चर्चा करायची असेल तर मी स्वतःहून त्यांच्याकडे जातो. कारण आचारसंहिता असल्याकारणाने मला राज्यव्यापी दौर्‍यावर जायचे आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

First Published on: September 27, 2019 6:08 AM
Exit mobile version