विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात केंद्र सरकार मग्न; शिवसेनेची टीका

विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात केंद्र सरकार मग्न; शिवसेनेची टीका

ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

केंद्रातील राज्यकर्ते सध्या राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात मग्न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे चिंतामग्न झालेल्या सामान्य माणसाची काळजी वगैरे करण्याशी त्यांचा संबंध राहिलेला नाही, अशा शब्दांत शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने केंद्र सरकारवर प्रहार केले आहेत. (The central government is engrossed in destabilizing opposition governments; Criticism by Shiv Sena in samna edit)

हेही वाचा – …तो उसे भुला नहीं कहते, बंडखोर आमदारांच्या परतीबाबत संजय राऊत आशावादी

राज्यातील सत्तांतर नाट्य संपले असले तरीही शिवसेनेने केंद्र सरकारवर तोफ डागणे कमी केले नाही. दरम्यान, नियमित सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेकडून नवे नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच काल गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा तब्बल ५० रुपयांनी वाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर आणखी बोजा बसला आहे. यावरून सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले.

देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील उच्चांक तर गाठलाच आहे, पण त्या उच्चांकात भरच घालण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर बुधवारी ५० रुपयांनी महाग झाले. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईमध्ये १ हजार ५२ रुपयांच्यावर वर गेली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरच्या किमती ८३४.५० रुपयांवरून १०५२ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणजे एका वर्षांत तब्बल २१८.५० रुपयांचा वाढीव बोजा प्रत्येक कुटुंबाच्या बजेटवर पडला आहे. पुन्हा फक्त गॅस सिलिंडर महाग झाले असे नाही तर नव्या गॅस कनेक्शनसाठीही प्रति सिलिंडर ७५० रुपयांची वाढ केली आहे. जे रेग्युलेटर आधी दीडशे रुपयांना मिळत होते ते आता २५० रुपयांना मिळणार आहे आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी असलेली सुरक्षा ठेवदेखील ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे. थोडक्यात तुम्ही जुने गॅसग्राहक असा अथवा नसा, तुम्हाला गॅस दरवाढीचे चटके सहन करावेच लागणार आहे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा संजय राऊतांमुळे ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले, शंभूराज देसाईंचा आरोप

महागाईसोबतच या अग्रलेखातून जीएसटीवरही टीकास्त्र सोडण्यात आले. जीएसटीमुळे केंद्र सरकारची तिजोरी मागील काही महिन्यांपासून अब्जच्या अब्ज उड्डाणे घेत आहे. पण सामान्य माणसाच्या खिशातील उरलेसुरले किडुकमिडुकदेखील हे जीएसटीचे भूत ओरबाडून घेत आहे, त्याचे काय असा सवाल विचारण्यात आला.

दरम्यान, मागील आठ वर्षांतील उच्चांकी महागाईने देशातील सामान्य जनता जगण्या-मरण्याच्या कोंडीत सापडली आहे. या कोंडीतून तिला ज्यांनी बाहेर काढायचे ते महागाई कमी करण्याऐवजी विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात, २०१४ मध्ये स्वपक्षाला स्थिर करण्यात आणि देशाला जागतिक लिडर वगैरे कसे केले या आत्मानंदात मशगुल आहेत. आत्ममग्न सरकार आणि चिंतामग्न जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था आहे. ती कधी आणि कशी बदलणार हा प्रश्नच आहे, असा सवालही या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

First Published on: July 7, 2022 8:39 AM
Exit mobile version