मुंबईतील मराठा आंदोलन स्थगित

मुंबईतील मराठा आंदोलन स्थगित

मुंबईतील मराठा आंदोलन स्थगित

आझाद मैदानात सुरू असलेले मराठा तरुणांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा तरुणांशी चर्चा करत आंदोलन मैगे घ्यायला लावले. गेले ४७ दिवस हे आंदोलन सुरु होते. मराठा तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सोडवणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना दिले आहे.


हेही वाचा – समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहांमध्ये सॅनिटायझरचे वाटप


मराठा तरुणांच्या नोकरीसंदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा तरुणांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात काही आंदोलकांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलवे होते. दरम्यान, आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा तरुणांशी संवाद साधला. यावेळी मराठा आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यास लावले. दरम्यान, पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत योग्य ते निर्णय घेतले जातील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उपोषणाला बसलेल्या मराठा तरुणांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री

मराठा समाजातील शेकडो तरुण मागच्या ४७ दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार या तरुणांच्या पाठिशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिले. भाजपचे आमदार विनायक मेटे यांनी लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते.

आघाडी सरकारने जुलै २०१४ साली एसईबीसी प्रवर्गाच्या माध्यमातून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यानंतर शासनाने नोकरभरतीची जाहीरातही काढली होती. यादरम्यान ३५०० मराठा उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरले होते. मात्र नोव्हेंबर २०१४ साली उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही, त्यामुळे मागच्या पाच वर्षांपासून जवळपास ३५०० हजार उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. २०१८ च्या महाराष्ट्र अधिनियमन क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये नियुक्ती मिळण्याकरिता मागच्या ४७ दिवसांपासून मराठा तरुण आपल्या कुटुंबासहीत आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. या तरुणांना न्याय देण्याची मागणी मेटे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि भाई गिरकर यांनी केली.

या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत त्यांना सगळ्या कायद्याचा विचार करून न्याय देण्याचे काम आणि शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

उपोषणकर्त्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची समजूत काढावी तसेच २०१४ च्या ऐवजी इतर भरतीमध्ये त्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करु
उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडताना वकील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. तसेच काही तारखांना देखील अधिकारी गेले नाहीत, त्यामुळे त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी दरेकर यांनी केली. या प्रकरणात मुद्दामहून कुणी काही केले असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

First Published on: March 14, 2020 5:13 PM
Exit mobile version