गद्दारांना गाडणारच , ठाकरेंची शिवगर्जना

गद्दारांना गाडणारच , ठाकरेंची शिवगर्जना

 आमचा धनुष्यबाण चोरीला गेला आहे, पण धनुष्य चोरांना आणि त्यांच्या मालकांना महापालिका निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शिवगर्जना करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारले. हिंमतवान शिवसैनिक संपलेला नसून शिवसेनेला कोणी संपवू शकत नाही, या शब्दात ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला आव्हान दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केले. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. आयोगाच्या निकालानंतर ठाकरे यांनी शनिवारी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयोगाच्या निकालावर खल करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर कलानगर चौकात जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे पुत्र आदित्य आणि तेजस दोघेही उपस्थित होते.

भाजप आणि पंतप्रधानांना वाटत असेल आपल्या हाती तपास यंत्रणा आहेत, पण शिवसेनेला संपवणे सोपे नाही. आयोगाच्या गुलामांनी मालकांच्या आदेशाने शिवसेना कोणाची हे ठरवले असेल, परंतु शिवसेना कोणाची हे राज्यातली जनता ठरवेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आतापर्यंत मोदींचा चेहरा घालून मते मागितली जात होती, मात्र आता मोदींची जादू ओसरली आहे. मोदींनासुद्धा बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. त्यामुळेच हे कारस्थान रचले असून त्यांना बाळासाहेबांचे कुटुंब मात्र नको आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

आज आमचा धनुष्यबाण चोरीला गेला. उद्या ते आमची मशाल काढून घेतील. रावणाने धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उठताना पडला, असे सांगत हे शिवधनुष्य तुम्हाला उताणे पाडेल आणि तुमच्या छाताडावर भगवा फडकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला दिला.

लढाई आता सुरू झाली आहे. मी खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका, असा सल्ला त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. लवकरच निवडणुका लागतील, त्यामुळे निवडणुकीला तयार राहा. आपल्याला चोरांचा आणि चोरांच्या मालकांचा नायनाट करायचा आहे, असा आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मातोश्रीबाहेरून…
#‘शिवसेना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’,‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी शिवसैनिकांनी कलानगरचा परिसर दणाणून सोडला.
# उद्धव ठाकरे यांनी गाडीच्या टपावरून भाषण केले. या भाषणासाठीची तयारी तेजस ठाकरे करताना दिसत होते.
# १९६८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाडीच्या टपावर उभे राहून भाषण केले होते, त्याची आठवण उद्धव यांच्या आजच्या भाषणाने अनेकांना झाली.

शिवसेनेला केंद्रात ४ मंत्रिपदांची लॉटरी?

 शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटासाठी पुन्हा एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या १० दिवसांत पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून शिवसेनेला एक दोन नव्हे तब्बल ४ मंत्रिपदांची लाटरी लागणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहे, परंतु राज्य मंत्रिमंडळाआधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे समजते. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या निकालानंतरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची कुजबुज याआधी राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्यानंतर आता लवकरच १० दिवसांत हा विस्तार मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटाला केंद्रात २ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे. यात मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते, असे बोलले जाते. यात खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग बारणे आणि भावना गवळी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मोदी सरकार मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत असल्याचेही चर्चिले जात आहे. शिंदे गटाला शिवसेना नावासह आता धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने मुंबई महापालिका निवडणूक सोप्पी जावी, तसेच शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी या हेतूनेच राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विदर्भात प्रतापराव जाधव यांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्हीच आमचा पक्ष आणि तुम्हीच चिन्ह!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे घाबरायचे कारण नाही. जनतेला माहीत आहे की तुम्हीच पक्ष आहात आणि तुम्हीच आपले निवडणूक चिन्ह आहात. त्यामुळे काहीही चिन्ह मिळू द्यात, आपण निवडणूक जिंकू. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केलेल्या खासदार आणि आमदारांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बदललेल्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शिंदे गटाकडून पक्षादेश (व्हीप) जारी केला जाण्याची शक्यता बैठकीत चर्चिली गेली, मात्र जेव्हा न्यायालयात पक्षाचा वाद प्रलंबित असतो त्यावेळी व्हीप बजावता येत नाही, अशी माहिती देण्यात आली.

मुंबईतील २२८ शिवसेना शाखा आपल्या बाजूने आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या दबावाखाली काही शाखाप्रमुख त्या गटात गेले तरी त्या ठिकाणी पर्यायी शाखा उभ्या करू, असा निर्णयही बैठकीत झाला.

महापालिका तसेच विधिमंडळात दिलेली कार्यालये सरकारी असतात. आपल्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा आपण ती प्राप्त करू शकतो, अशी माहिती या बैठकीत पुढे आली. मंत्रालयाच्या समोरील शिवालय त्यांना गेले तरी सरकारला आपल्याला पर्यायी कार्यालय द्यावेच लागेल, असे आमदारांनी बैठकीत स्पष्ट केले.

महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठीच आयोगाचा एकतर्फी निर्णय आलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी असून महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नेत्यांना केली.

उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे आज, रविवारी समाज माध्यमावर राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सर्व मुद्यावर सविस्तर बोलावे, अशी विनंती उपस्थित नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना केल्याचे समजते.

दोघांनाही एकमेकांवर व्हीप लावता येणार नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे दोन्हीही पक्ष वेगळे झाले आहेत. जसा काँग्रेसचा व्हीप राष्ट्रवादीला लागू होत नाही आणि राष्ट्रवादीचा व्हीप काँग्रेससाठी लागू होत नाही त्याप्रमाणे शिवसेनेचा व्हीप ठाकरे समर्थक आमदारांना लागू होणार नाही. पक्षाची प्रॉपर्टी हा एक वेगळा विषय आहे. जसे शिवसेना भवन आणि इतर प्रॉपर्टी म्हटले तर ती संस्थेची आहे. त्यामुळे शिंदे गट इथे दावा करू शकत नाही. त्या संस्थेला वाटेल त्याकडे ती प्रॉपर्टी जाऊ शकते. पक्षाचा फंड म्हणून आलेला असेल तर त्याच्यावरती शिंदे गटाचा दावा राहील.
– श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ते, महाराष्ट्र

शिंदेंचाच व्हीप पाळावा लागणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचा निर्णय आमच्या बाजून दिल्यामुळे आता शिवसेनेच्या सर्व आमदारांना नियमानुसार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच व्हीप पाळावा लागणार आहे. जो कुणी व्हीप पाळणार नाही त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
– दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

First Published on: February 19, 2023 6:00 AM
Exit mobile version