उद्धव ठाकरे महिला नेत्याला देणार मुख्यमंत्रीपदाची धुरा? चर्चेला उधाण

उद्धव ठाकरे महिला नेत्याला देणार मुख्यमंत्रीपदाची धुरा? चर्चेला उधाण

मुंबई – शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, असं स्वप्न शिवसेनासंस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. त्यानुसार, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षांचाच राहिला. त्यातही कोरोनाचा संसर्ग त्यांच्याच कार्यकाळात आल्याने सत्ता टिकवण्यासाठी त्यांना अफाट मेहनत घ्यावी लागली. परंतु, आता येत्या निवडणुकीत सत्तेत आल्यास शिवसेनेतून महिला नेता मुख्यमंत्री होण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा – Gram Panchayat Election : सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ

आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे देशात मोठी ताकद आपण उभी करू शकतो, असा विश्वास यावेळी ठाकरेंनी बोलू दाखवला. मातंग समाज दुर्लक्षित राहिला आहे. अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई मिळवून दिली. पण त्यांचं मुंबईत एकही स्मारक नाही. त्यांना अजूनही भारतरत्न दिलेला नाही. त्यामुळे मला लवकरच एक मेळावा घ्यायचा आहे. ज्यात लहूशक्ती-भीमशक्ती आणि शिवशक्तीचं प्रदर्शन दिसेल. याद्वारे आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्या अधिकारांसाठी संघटित होण्याची ताकद मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही

गद्दार मूठभर सुद्धा नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत. हे सध्या मी अनुभवतो आहे. मी घराबाहेर पडतो आहे तरी त्यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असं ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक रणरागिनी पुढे आल्या आहेत. मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकर यांनी आपला दबदबा निर्माण केलाय. त्यामुळे शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या नेहमीच आघाडीवर असतात. त्यातच, सुषमा अंधारे यांच्यानिमित्ताने शिवसेनेला एक नवा चेहरा मिळाला आहे. निलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, प्रियंका चर्तुवेदी आदी महिला नेत्या नेहमीच आघाडीने शिवसेनेची बाजू मांडतात. त्यामुळे यापैकी कोणाकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा उद्धव ठाकरे देतील हे येत्या काळात समजेल.

हेही वाचा आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले

First Published on: December 1, 2022 10:14 AM
Exit mobile version