दर दोन वर्षांनी भूमिका बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये, वरुण सरदेसाईंचा मनसेवर हल्लाबोल

दर दोन वर्षांनी भूमिका बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये, वरुण सरदेसाईंचा मनसेवर हल्लाबोल

दर दोन-चार वर्षांनी भूमिका बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलून नये, असा हल्लाबोल युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेनेवर गेली काही दिवस टीका करत आहे. या टीकेला सरदेसाई यांनी उत्तर दिलं.

आमच्या स्थापनेपासून आम्ही कधी झेंडा बदलला नाही. आमच्या झेंड्याचा कधी रंग बदलला नाही. आमचा कधी आम्ही नेता बदलला नाही, कधी विचार बदलला नाही. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही. दर दोन चार वर्षांनी स्वत:चा झेंडा बदलणाऱ्यांनी, स्वत:चं निवडणूक चिन्ह कधी उजवीकडून धावतं, कधी डावीकडून उजवीकडे धावतं, कधी कुठला रंग त्यात सामील करता, कधी एखादा रंग काढून टाकतात. दर दोन चार वर्षांनी स्वत:ची भूमिका बदलतात, अशा लोकांनी शिवसेनेवर बोलू नये, त्यांनी स्वत:चं काम करावं, आम्ही आमचं काम करावं, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.

सरदेसाई पुढे म्हणाले, शिवसेनेचा झेंडा स्थापनेपासून फक्त आणि फक्त भगवा राहिलेला आहे. आमच्या भगव्यामध्ये कुठलीही भेसळ नाही. बाकिच्या लोकांचे झेंडे कुठल्या कुठल्या रंगांनी भरले आहेत साऱ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. शिवसैनिक कुठल्याच आव्हानाला मागे हटलेला नाही. त्यामुळे जर कोणी आमच्या मंदिरावर, देवळावर आक्रमण करायची भाषा करत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरणार, आम्ही बघतोय ते कधी येतात, असं सरदेसाई म्हणाले.

देशाची जनता शिवसेनेचं हिंदुत्व किती प्रखर आहे हे जाणतं

मातोश्री हे हिंदुदृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी देऊळ आहे, मंदीर आहे. कोणी तरी आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होणारच म्हणून हा शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला दिसतोय. महाराष्ट्राची, देशाची जनता शिवसेनेचं हिंदुत्व किती प्रखर आहे हे जाणतं, असं वरुण सरदेसाई म्हणाले.

 

First Published on: April 16, 2022 11:59 AM
Exit mobile version