विनोद कांबळींना अखेर मिळाली नोकरी, मराठी उद्योजकाने दिली एक लाख वेतनाची ऑफर

विनोद कांबळींना अखेर मिळाली नोकरी, मराठी उद्योजकाने दिली एक लाख वेतनाची ऑफर

विनोद कांबळी

मुंबई – माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना अखेर नोकरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील मराठी उद्योजक संदीप थोरात यांनी त्यांना काही दिवसांपूर्वी नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर विनोद कांबळी यांनी स्विकारली असून संदीप थोरात यांनी स्वतः विनोद कांबळी यांच्या घरी जाऊन ऑफर लेटर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी यांना आर्थिक चणचण जाणवत होती, अखेर त्यांना नोकरी मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – भारताचा माजी खेळाडू आणि सचिन तेंडुकरचा ‘हा’ खास मित्र जगतोय हलाखीचे जीवन

विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे नुकतेच प्रसिद्ध झाले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवृत्तीवेतनावर विनोद कांबळी आपली गुजराण करत होते. त्यामुळे त्यांना नोकरीची गरज आहे, असं त्यांनीच कबूल केलं होतं. मराठी माणसाची व्यथा लक्षात घेऊन मराठी उद्योजक संदीप थोरात यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. सह्याद्री मल्टिसिट फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत ते मानद संचालक म्हणून काम पाहणार आहेत. तसंच, त्यांना एक लाख रुपये वेतन मिळणार आहे.

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र होते. या दोघांनीही एकाच शाळेत शिक्षण घेतले असून, स्वर्गीय रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय संघात पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपली छाप पाडली होती. विनोद कांबळी याने करिअरच्या पहिल्या 7 सामन्यात 793 धावा करून खळबळ उडवली होती. 1993 मध्ये 113.29 च्या स्ट्राइक रेटने कसोटी धावा केल्या होत्या.

भारताकडून विनोद कांबळीने 2000 साली अखेरचा सामना खेळला होता. केवळ 17 सामन्यानंतर विनोद कांबळी संघाबाहेर पडला होता. वयाच्या 23 व्या वर्षी विनोदने अखेरची कसोटी खेळली होती. त्याची सरासरी 54 होती.

First Published on: September 3, 2022 11:03 AM
Exit mobile version