यंदा ज्ञानेश्वर म्हात्रे पराभवाचा वचपा काढणार का?

यंदा ज्ञानेश्वर म्हात्रे पराभवाचा वचपा काढणार का?

नवी मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आज शनिवार २८ जानेवारी रोजी या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कोकण विभागात शिक्षक निवडणुकीत सत्ताधारी शिंदे-भाजपा आणि शेकाप यांच्यात प्रचारा राज्यात झालेल्या सत्तातरानंतर या निवडणुकीला अधिक महत्वा प्रात्प झाले होते. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या चुरशीची लढतझाली होती. यात अवघ्या ४ हजार ९५० मतांनी बाळाराम पाटील विजयी झाले होते. मात्र यंदाच्या निवडुकीत भाजपा व शिंदे गटाने प्रचारात जोरदार घाडी घेतल्याने त्यातच ठाणे, नवी मुंबई, पनवेलची सुत्रे भाजपा-शिंदे गटाच्या हाती असल्याने ज्ञानेश्वर म्हात्रे गतवर्षाचा पराभवाचा वचपा काढण्यात यशस्वी होणार का? हे २ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. (Will Dnyaneshwar Mhatre defend his defeat this year)

कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांचा समावेश आहे. कोकण शिक्षक मतदार संघात पालघर जिल्ह्यात ९०००, ठाणे १५,७३६, रायगड १००००, रत्नागिरी ४३२८, सिंधुदुर्ग जिल्हयात २४५६ मतदार नोंदणी झाली असून एकूण ४१ हजार ५२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सन-२०१७ मध्ये झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघात एकुण १० उमेदवार रिंगणात होते. तर २०२३ मध्ये होणार्‍या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (भाजपा -शिंदे गट उमेदवार), बाळाराम दत्तात्रेय पाटील (अपक्ष-महाविकास आघाडी), धनाजी नानासाहेब पाटील (जदयु), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार भालेराव (अपक्ष), रमेश देवरुखकर (अपक्ष), प्राध्यापक राजेश सोनवणे (अपक्ष), संतोष डामसे (अपक्ष) या आठ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघावर भाजप आणि संघप्रणित शिक्षक परिषदेचे वर्चस्व होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचा विजय कायमच निर्विवाद मानला गेला. तत्कालीन आ.रामनाथ मोते यांच्या पराभव करुन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत बाळाराम पाटील यांनी मोते आणि शिक्षक परिषदेला धक्का दिला होता.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपा आणि शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शेकाप-अपक्ष उमेदवार बाळाराम पाटील यांच्या होणारी लढत ही सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. मागील निवडणुकीत ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल येथून बाळाराम पाटील यांना भरीव मते पडली होती.

दरम्यान राज्यातील राजकीय बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांच्या ठाणे शहर, माजी मंत्री आ.गणेश नाईक यांच्या नवी मुंबई शहर अणि पनवेल शहरातून आ. प्रशांत पाटील नेतृत्वाखाली भाजपाकडून त्याच प्रमाणे उरण, अलिबागमध्ये भाजपा आणि शिंदे गटाकडून या ठिकाणी भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रचारात मुसंडी मारली होती. तर शेकाप व महाविकास आघाडीने देखील नवी मुंबई, रायगडमध्ये प्रचाराचा जोर धरला होता.

आज शनिवार २८ जानेवारी रोजी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सोमवार ३० जानेवारी रोजी मतदान आणि त्यानंतर होणार्‍या मत मोजणीनंतर मतांचा कौल कुणाला असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


हेही वाचा – राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आता ‘अमृत उद्यान’, मंगळवारपासून होणार सर्वांसाठी खुले

First Published on: January 28, 2023 7:27 PM
Exit mobile version