राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आता ‘अमृत उद्यान’, मंगळवारपासून होणार सर्वांसाठी खुले

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. अमृत ​​महोत्सवाअंतर्गत मुघल गार्डनचे नव्याने नामकरण करण्यात आल्याचे आल्याचे सांगण्यात येते. हे उद्यान दरवर्षी सर्वसामान्यांसाठी खुले होते. त्यानुसार यंदाही ते मंगळवार, 31 जानेवारीपासून खुले होणार असून नागरिकांना दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत येथे भेट देऊ शकतात. ट्यूलिप आणि गुलाबाच्या विविध प्रजातींची फुले येथे पाहायला मिळतात.

राष्ट्रपती भवनात असलेले अमृत उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. येथे ब्रिटिश तसेच मुघल या दोन्ही उद्यानांची झलक पाहायला मिळते. हे उद्यान तयार करण्यापूर्वी एडविन लुटियन्सने प्रथम देशातील तसेच जगातील विविध उद्यानांचा अभ्यास केला. या बागेत रोपे लावण्यासाठी सुमारे एक वर्ष लागले.

रायसीना हिल्सस्थित राष्ट्रपती भवनाच्या आत 15 एकर परिसरात अमृत उद्यान आहे. या उद्यानामध्ये गुलाब, विविध प्रकारची अन्य फुले, 33 औषधी वनस्पती, बोन्साय (250 झाडे), निवडुंग (80 जाती) आहेत. याशिवाय सुमारे 160 जातींच्या पाच हजार झाडांचाही येथे समावेश आहे. याशिवाय येथे नक्षत्र उद्यान देखील आहे, परंतु सर्वसामान्यांना फेब्रुवारी ते मार्च या कालावधीतच येथे येण्याची मुभा आहे. यानंतर येथील गेट बंद होते.

विनामूल्य प्रवेश
मेट्रोने अमृत उद्यानात जायचे असेल तर सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन सेंट्रल सेक्रेटरिएट आहे. अमृत उद्यानात प्रवेश विनामूल्य आहे. अमृत ​​उद्यान सोमवारी बंद असते. याशिवाय यंदा होळीच्या दिवशी देखील हे उद्यान बंद राहील. येथे खाद्यपदार्थ सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. हे उद्यान 31 जानेवारीपासून 26 मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तर, 28 ते 31 मार्चदरम्यानचा कालावधी विविध श्रेणींच्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

अनेक संस्था, इमारती, रस्त्यांचे नामकरण
साधारणपणे, केंद्र तसेच सरकारांकडून वेळोवेळी अनेक ठिकाणांची नावे बदलली जातात. त्याअुषंगाने अनेक इमारती, संस्था आणि रस्त्यांची, इतकेच नव्हे तर शहरांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड, नियोजन आयोगाचे नीती आयोग, रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्यात आले आहे.