कल्याण पश्चिम विधानसभेत ४०९ मतदान केंद्र

कल्याण पश्चिम विधानसभेत ४०९ मतदान केंद्र

लवकरच होणार निवडणुकीची घोषण

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून ऑक्टोबर मध्यावर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. १३८ कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी कल्याणमधील खडकपाडा मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथे कार्यलय सुरू करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम विधानसभेसाठी २ लाख ३५ हजार ४८५ पुरुष मतदार, २ लाख ८७ हजार ७३८ स्त्री मतदार ६ इतर मतदार असे एकूण ४ लाख ४४ हजार २२७ मतदार आहेत. दरम्यान, अजूनही मतदार नोंदणी सुरू असून या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – उल्हासनगरमध्ये फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षा; अनुदानित शाळेकडून फी वसुली

१५ हजार नव्या उमेदवारांची नोंदणी

लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे १५ हजार मतदारांनी नव्याने नोंदणी केली आहे. या सर्व मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कल्याण विधानसभेसाठी मूळ मतदान केंद्र ४०९, सहाय्यक मतदान केंद्र ११ असे एकूण ४२० मतदान केंद्र आहेत. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही मतदाराला मतदान करण्यासाठी जिने चढावे-उतरावे लागू नये यासाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावरच असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ यांनी सांगितले. निवडणुकीचे साहित्य वितरण, साहित्य संकलन, सुरक्षा कक्ष मतमोजणी देखील याच ठिकाणाहून होणार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून ६ फ्लाईंग स्कॉड १२ स्टॅटिस्टिक सर्विलांस टीम, ६ व्हिडियो सर्विलन्स टीम, २ व्हिडियो व्युविंग टीम असणार असून सर्व परवानग्या या कार्यलयातून देण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी ५३७ केंद्राध्यक्ष, ५४१ प्रथम मतदान अधिकारी, १०५४ मतदान अधिकारी, ५३७ शिपाई तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १, दुपारी २ ते ५ दरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक कालावधित आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकरी पडवळ यांनी सांगितले. तसेच गेल्यावर्षी या मतदारसंघात ४३ टक्के मतदान झाले होते. ही मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी यंदा निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याचे पडवळ यांनी सांगितले.

First Published on: September 24, 2019 9:31 PM
Exit mobile version