मानखुर्दमध्ये ९ लाख १६ हजारांच्या बोगस नोटांसह इतर साहित्य हस्तगत

मानखुर्दमध्ये ९ लाख १६ हजारांच्या बोगस नोटांसह इतर साहित्य हस्तगत

बोगस नोटांची छपाई करणार्‍या रोहित मनोज शहा या २२ वर्षांच्या तरुणाला शनिवारी मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या बोगस नोटांसह दोन लाख रुपयांचे छपाईचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मानखुर्द येथील ज्योतिर्लिंग नगर, सोनापूरमध्ये डुक्कर चाळ असून या चाळीतील एका रुममध्ये रोहित शहा नावाचा एक तरुण बोगस नोटांची छपाई करीत असल्याची माहिती पोलीस शिपाई केदार आणि मीर यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांच्या पथकातील राजू सुर्वे, आदिनाथ गावडे, दिपक दळवी, मीर, सोनावणे, दरेकर, केदार, शिंदे, शेंडे आणि कदम यांनी तिथे छापा टाकला होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांना रोहित हा दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या बोगस नोटांची छपाई करताना रंगेहाथ सापडला. घटनास्थळाहून पोलिसांनी दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या ७ लाख १६ हजार १५० रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. तसेच नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप, कलर प्रिंटर, कलर बॉटल, कागद असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात रोहित हा कांदिवलीतील आकुर्ली रोड, क्रांतीनगर परिसरात राहत असून तो सेल्समन म्हणून काम करतो. बोगस नोटांच्या छपाई केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत रोहित हा गेल्या काही महिन्यांपासून तिथे बोगस नोटांची छपाई करीत होता. त्याने आतापर्यंत किती रुपयांचे बोगस नोटा बनविल्या आहेत, या नोटा त्याने चलनात आणल्या आहेत का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: September 18, 2022 5:30 AM
Exit mobile version