फिर्यादीच निघाला आरोपी; भिवंडीतील बारचालक गोळीबार प्रकरणी खुलासा

फिर्यादीच निघाला आरोपी; भिवंडीतील बारचालक गोळीबार प्रकरणी खुलासा

अटक

भिवंडी तालुक्यातील राजनोली नाका येथील स्विट हार्ट या लेडीज ऑर्केष्ट्रा बारचालक अमोल बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी कोनगाव पोलीसांनी इंदौर येथून अटक केलेल्या दोन आरोपींच्या तपासात गोळीबार करण्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार हा खुद्द जखमी बारचालक अमोल बोऱ्हाडे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याने यु ट्यूब वरील व्हिडिओ पाहून उसनवार पैसे घेतलेल्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हे सर्व नाटक रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. २८ मे च्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास स्विट हार्ट या लेडीज ऑर्केष्ट्रा बारचे चालक अमोल बोऱ्हाडे हे बारच्या मागील बाजूस सिगारेट पित असताना पल्सर दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पाठीच्या वरच्या बाजूला गोळीबार करत जखमी केले होते. या बाबत कोनगाव पोलीसांनी गुन्हा नोंदवत हल्लेखोरांचा तपास सुरु केला असता इंदौर येथून कपिल कथोरे (रा. कांदळी ता. भिवंडी) आणि इरफान शेख (रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघा आरोपींना गावठी कट्ट्यासह अटक करुन भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती.

दरम्यान, कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी कसून चौकशी केली असता या आरोपींकडून धक्कादायक माहिती मिळत असताना जखमी अमोल बोऱ्हाडे याचे आरोपींसोबत मोबाईल संभाषण झाल्याचे तसेच या गुन्ह्यातून आरोपींच्या सोडवणुकीसाठी मदत करणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीसांनी बोऱ्हाडे याच्याकडे आपल्या चौकशीचा मोर्चा वळवला असता धक्कादायक बाब उघड झाली आहे. बारचालक अमोल बोऱ्हाडे याने आपल्या व्यवसायासाठी बऱ्याच ओळखीतील व्यक्तींकडून सुमारे तीन कोटी रुपये उधार घेतले होते. सध्या आर्थिक तंगीमुळे पैसे परत करण्याची ऐपत नसल्याने ते देण्यासाठी वेळ मिळावा तसेच त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने यु ट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यामध्ये उजव्या पाठीच्या वरच्या बाजूस गोळी लागल्यास इसम जखमी होऊ शकतो, मृत नाही याची कल्पना आल्याने अमोल बोऱ्हाडे यानेच आपल्या ओळखीतील कपिल कथोरे आणि इरफान शेख यांच्यासोबत चर्चा करुन या गोळीबार करण्याचे नाटक रचले हे स्पष्ट झाले आहे. या खुलासा केल्यानंतर या गुन्ह्याला नवी कलाटणी मिळाली असून पोलीस तपासाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

First Published on: June 8, 2019 12:53 PM
Exit mobile version