मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करावे

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करावे

शिक्षणमंत्र्यांची शिक्षक भरतीची घोषणा हवेतच

मुंबईत अतिरिक्त शिक्षक ९९५ असून मराठी माध्यमातील शाळांमध्ये रिक्त जागा फक्त १० असल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईच्या बाहेर करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीने शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे केली. भाजपा प्रदेश शिक्षक सेल मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी काल मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची भेट घेतली तसेच त्यांना मुंबईतील शिक्षकांचे समायोजन इतर ठिकाणी न करता मुंबईतच करावे, अशी मागणी केली. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संचालक व राज्याचे अप्पर मुख्य सचिवांकडे भाजपा प्रदेश शिक्षक सेलचे निवेदन पाठविले आहे. तसेच अनिल बोरनारे यांनी आज शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडेही निवेदन दिले असून मुंबईच्या शिक्षकांना मुंबईतच ठेवावे, अशी मागणी केली.

काही शाळांची पटसंख्या शून्य

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांमध्ये महिला शिक्षिकांचे प्रमाण मोठ्या संख्येने असून कुटुंबियांपासून दूर राहणे शिक्षकांना गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली आहे. मुंबईत उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालये असून तिनही निरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये ९९५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर काही शाळांची पटसंख्या शून्य झाल्याने सगळे शिक्षक-शिक्षकेतर अतिरिक्त ठरले आहेत. मुंबईतील अनुदानित विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असून त्याचा मोठा फटका शिक्षक-शिक्षकेतरांना बसत आहे. त्यात संचमान्यतेच्या नियमात बदल केल्यामुळेही मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेतर अतिरिक्त होत आहेत.

हेही वाचा –

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही – शिवेंद्रराजे भोसले

आता धनगर समाजाला मिळणार आदिवासींच्या सवलती

First Published on: July 30, 2019 4:30 PM
Exit mobile version