बीकेसीनंतर वरळीची हवा सुद्धा वाईट; मुंबईकरांचा श्वास कोंडला

बीकेसीनंतर वरळीची हवा सुद्धा वाईट; मुंबईकरांचा श्वास कोंडला

बीकेसीनंतर वरळीची हवा सुद्धा वाईट

मुंबईची हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय वाईट असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मध्येच बरसणारा पाऊस आणि मध्येच लागणारं ऊन यामुळे मुंबईकरांची दैना होत आहे. मुंबईदेखील प्रदूषणाबाबत दिल्लीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. गेल्या आठवड्याभरापासूनच मुंबईतील हवेचा वाईट दर्जा नोंद करण्यात येत आहे. मुंबईची हवा शुक्रवारी म्हणजे २८ डिसेंबर या दिवशी मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली. हवेतील प्रदूषकांचं प्रमाण कमी झाल्याने किमान तापमानातही घट नोंदवली आहे. मुंबईपाठोपाठ नवी मुंबईही प्रदूषित होत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

बीकेसीतील हवेचा दर्जा अत्यंत वाईट

मुंबईतील बीकेसी या परिसरातील हवा गेल्या काही दिवसांपासून वाईट दर्जाची आहे. सातत्त्याने बीकेसी प्रदूषित झाल्याचं नोंद करण्यात आलं आहे. बीकेसीत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. शिवाय, हा परिसर कॉर्पोरेट असल्यामुळे वाहनांची ही मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते. ‘सफर’ या संकेतस्थळावर नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार, बीकेसीतील हवेचा अत्यंत वाईट दर्जा नोंदवण्यात आला आहे. आता त्या पाठोपाठ वरळीचा क्रमांक लागत आहे. शनिवारी वरळीची ही हवा ही वाईट दर्जाची नोंदवण्यात आली आहे.

बदलत्या वातावरणाचा मुंबईकरांवर परिणाम

मुंबईत सातत्त्याने होणारी बांधकामे, खाणकामे, शिवाय कारखान्याचा धूर अशा सर्व प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांमुळे मुंबईसह नवी मुंबई ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. ‘सफर’ संस्थेने नोंदवलेल्या गुणवत्तेनुसार, मुंबई पूर्ण शहरात मध्यम हवेचा दर्जा नोंदवण्यात आला आहे. बीकेसी आणि वरळी या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा वाईट नोंदवण्यात आला आहे. तर, सर्वात जास्त भांडुपमध्ये उत्तम समाधानकारक अशी हवा नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर मालाड, माझगाव, बोरीवली, चेंबूर, अंधेरी आणि नवी मुंबईत मध्यम स्वरुपाची हवा नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासून हवेत गारवा जाणवत होता. त्यामुळे हळूहळू मुंबईत थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, डोकेदुखी या आजारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा – हाफकिनकडून औषध मागणीचे टेंडर विलंबाने?

First Published on: December 28, 2019 8:24 PM
Exit mobile version