सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या दोघांना अटक

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या दोघांना अटक

दोघांना अटक करताना पोलीस

सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून खंंडणी मागणार्‍या दोघांना एमएचबी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अश्विनी किशोरीलाल शर्मा आणि साजिद वारेकर अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या अशाच अन्य काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवलीतील चारकोप परिसरात तक्रारदार महिला राहत असून ती एलआयसी एजंट म्हणून काम करते. तिच्या पतीची काही दिवसांपूर्वी अश्विनी शर्मा आणि साजिद वारेकर यांच्यासोबत ओळख झाली होती. या दोघांनी ते सीबीआयमध्ये कार्यरत असल्याची बतावणी करून त्यांच्याशी मैत्री केली होती. तक्रारदाराचे पती एका पतपेढीमध्ये कामाला आहेत. या पतपेढीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून तो मिटविण्यासाठी त्यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

ही रक्कम घेऊन त्यांना बोरिवलीतील लिंक रोडवरील एस. के रिसॉर्टमध्ये बोलाविले होते. ही रक्कम दिली नाही, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना चकमकीत ठार मारू अशी धमकी दिली होती. त्यामुळे भयभीत तक्रारदारासह त्यांच्या पतीने त्यांना 50 लाख रुपयांची कॅश आणि 27 लाख रुपयांची एक इनोव्हा कार दिली होती. मात्र, ही रक्कम आणि कार घेतल्यानंतर ते दोघेही त्यांच्याकडे आणखी एका इनोव्हा कारची मागणी करीत होते. शेवटी त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते दोघेही पती-पत्नी एमएचबी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही बोरिवली परिसरातून इनोव्हा कार घेण्यासाठी आले असता पोलिसांनी शिताफीने अटक केली.

त्यांच्याकडून पोलिसांनी 75 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील आश्विनी शर्मा हा हरियाणाच्या पानिपतचा तर साजिद हा ठाण्याचा रहिवाशी आहेत. या दोघांविरुद्ध अनुक्रमे पाच आणि दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून याच सर्व गुन्ह्यांत त्यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर येताच ते दोघेही पुन्हा आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या दोघांकडून उर्वरित रक्कम आणि इनोव्हा कार लवकरच हस्तगत केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

First Published on: November 14, 2018 5:48 AM
Exit mobile version