सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, पण…

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, पण…

लोकल ट्रेन

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी पुन्हा रुळावर धावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं चित्र दिसतंय. मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत, अशी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. तर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटत असल्याने राज्यात पुन्हा लोकल सुरू करण्याच्या की नाही या विचारात सरकार आहे.

दरम्यान, मध्यरेल्वेने कोरोनादरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिला प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास सुरू करण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मूभा दिल्यानंतर लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई लोकलबद्दल बोलतांना त्यांनी असेही सांगितेल की, राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय सुरू आहे. मुंबईची लोकल सेवा लवकरच सुरू व्हावी यासाठी काही पर्याय देखील स्वीकारण्यात आले आहे. तर आतापर्यंत २० श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज आहे. मात्र राज्य सरकारकडून परवानगी मिळताच लोकल सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


First Published on: January 24, 2021 10:28 AM
Exit mobile version