कल्याण डोंबिवलीकर प्रवाशांचे पाच तास मेगा हाल; रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार

कल्याण डोंबिवलीकर प्रवाशांचे पाच तास मेगा हाल; रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार

कल्याण डोंबिवलीकर प्रवाशांचे पाच तास मेगा हाल

नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने मध्य रेल्चेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांवर तब्बल पाच विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. ऐन सकाळी कामावर जाण्याच्यावेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर चाकरमण्यांचे मेगा हाल झाले. मेगा ब्लॉक प्री प्लॅन असतानाही रेल्वे प्रशासनाला नियोजन करता आले नाही, त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. दरम्यान, दुपारी दोन नंतर लोकलसेवा पूर्ववत झाली.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर टाकण्यात आले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे कल्याणहून मुंबईकडे जाणारी व डोंबिवलीहून कल्याणकडे जाणारी लोकलसेवा बंद होती. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली रेल्वे फलाटावर प्रवाशांची खूपच गर्दी होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने लोकल सोडण्यात येत होत्या. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीने गच्च भरले होते. डोंबिवलीकडे येणाऱ्या लोकल या केापर, दिवा येथून प्रवाशांनी भरून येत असल्याने डोंबिवलीकर प्रवाशाला गाडीत शिरणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास रेल्वे फलाटावरच ताटकळत उभे राहावे लागले. वाढत्या गर्दीमुळे व कामावर जाण्यास उशिर होत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांच्याकडून प्रवाशांना शांत राहण्याच्या सुचना मेगा फाेनद्वारे दिल्या जात हेात्या. प्रचंड गर्दीचा सामना करीत प्रवाशांना लटकतच प्रवास करावा लागला. त्यामुळे ऑफीसला लेटमार्कही बसला. दुपारी पावणे दोन वाजता गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाली. मात्र त्यानंतरही लेाकलला प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.

रिक्षा चालकांकडून नेहमीचीच लूटमार …

मेगाब्लॉग प्रीप्लान असूनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाकडून कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून आले. कल्याणहून डोंबिवली रिक्षा प्रवाशासाठी रिक्षा चालकांकडून प्रवाशांची नेहमी प्रमाणे लूटमार करण्यात आली. मीटर प्रमोण रिक्षा चालविल्या जात नव्हत्या. रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून दोनशे ते तीनशे रूपये असे चौपट भाडे उकळले जात होते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मेगा ब्लॉक अथवा रेल्वेचा गोंधळ रिक्षा चालकांकडून नेहमीच प्रवाशांची लूटमार केली जाते. मात्र या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओचे कोणताही धाक नसल्याचेच दिसून येते त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

केडीएमटीकडून विशेष बससेवा …

मेगाब्लॉकमुळे कल्याण डोंबिवली प्रवासासाठी केडीएमटीकडून विशेष २० बस सोडण्यातआल्या होत्या. कल्याण स्टेशनहून व डोंबिवली बाजी प्रभू चौकातून प्रत्येकी १० मीनटाने बसेस सोडण्यात आल्या. नाताळ असल्याने अनेकांना सुट्टी होती मात्र इतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनकडून बसेस साेडण्यात आल्या. मात्र पत्रीपूलावरील वाहतूक केांडीत बसेस अडकल्याने प्रवाशांना वाहतूक केांडीत अडकून पडावे लागले होते. बसेसला गर्दी झाली होती त्यामुळे वयोवृध्द व महिलांना त्रास सहन करावा लागला.

कल्याण- ठाणे एसटी प्रवासाला प्राधान्य

कल्याणहून मुंबईकडे जाणारा मार्ग बंद असल्याने कर्जत व कसारा कडील लोकल कल्याणकडे थांबविण्यातआल्या होत्या. त्यामुळे कर्जत व कसारा कडील प्रवाशांनी कल्याणला उतरून पुढील प्रवास बसेसने केला. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची खूपच गर्दी झाली होती. एसटी महामंडळाची कल्याण- ठाणे एसटी बस सेवा असल्याने प्रवाशांनी कल्याणहून ठाण्याला एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य दिला.

डोंबिवलीकर काही तरी कर …सोशल मिडीयातून झाले व्यक्त …

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना हाल सोसावे लागल्याने अनेक डोंबिवलीकरांनी सोशल मिडीयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबिवलीला खरी गरज कुठली आहे…? ठाणे – डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता, ठाणे – डोंबिवली मेट्रो की पाहीजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन भिवंडी- डोंबिवली – तळोजा मेट्रो का नागरिकत्व कायद्याला समर्थन करणे की विरोध करणे… नक्की कश्याला प्राधान्य द्यायचे, की विकासाची वाट बघत बघत एका पिढी कडून पुढच्या पिढी कडे लटकत, लोंबकळत मरायचे…शांत डोंबिवलीकर तु जोवर शांत आहेस तोवर तू असाच जगणार, तुम्ही फक्त हाडा मांसाचे जिवंत सापळे आहात.. ज्या जगण्याला मरण म्हणतात…डोंबिवलीकर काहीतरी कर…अशी भावना सोशल मिडीयातून व्यक्त करण्यात आली.


हेही वाचा – आरोग्यसेविकांच्या वेतनमुद्यावरुन लटकंती सुरूच; ९ हजारांवरच मानावे लागते समाधान


 

First Published on: December 25, 2019 4:45 PM
Exit mobile version