‘अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही’

‘अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही’

विनोद तावडे

आता जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात अर्ज करणार्‍या मराठा विद्यार्थ्यांना यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रकियेत सहभाग घेता येणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेतील अट आजपासून शिथील करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवेश प्रक्रियेत ही अट शिथील करण्याचे मान्य केले आहे. उद्या, गुरुवार २७ जून रोजी प्रवेश प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत असून आज सकाळपासून जात पडताळणी प्रमाणपत्र अट शिथील करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. यामुळे प्रवेश मिळणार की नाही याची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर होती. त्या संदर्भात विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने तक्रारी केल्या गेल्या. मात्र मुख्यमंत्री आणि प्रवेश नियंत्रण समिती यांच्या बैठकीत प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on: June 26, 2019 1:34 PM
Exit mobile version