घरमहाराष्ट्रमराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

Subscribe

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजनांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते. मात्र तरीदेखील विद्यार्थी मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी राज्य सरकारने आज अध्यादेश काढला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. अध्यादेश राज्यपालांकडे सहीसाठी जाईल, त्यानंतर तो मंजूर होईल.

याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजच्या अध्यादेशातून चार महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. पहिला म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मेडीकलसाठी प्रवेश मिळणार आहेत, दुसरे म्हणजे प्रवेशाची २५ मे ची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली आहे, त्याआधी सर्वांचे प्रवेश होतील. त्यातही ही डेडलाईन ३१ मे पर्यंत वाढवावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे त्याचबरोबर मेडीकल अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून मिळण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. तसेच मराठा आरक्षण लागू केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी खासगी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर त्यांना मदत देण्याची भूमिका सरकारने ठेवली असल्याचा चौथा मुद्दा पाटील यांनी सांगितला.

- Advertisement -

राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अध्यादेश काढण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून अडकून पडलेला हा मुद्दा निकाली निघाला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण पुढच्या वर्षीपासून लागू होणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत आझाद मैदानात धाव घेतली आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. मराठा क्रांती मोर्चाने देखील या वादात विद्यार्थ्यांच्या बाजूने उतरत राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी धाव घेतली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -