अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

अंधेरीतील बोगस लसीकरण प्रकरणाचा पर्दाफाश, एकाला अटक

लसीकरण

मुंबईत लसीकरण मोहिमेला वेग आलेला असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी बोगस लसीकरणाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आतापर्यंत मुंबईत अनेक ठिकाणी बोगस लसीकरणाचा पर्दाफाश केला आहे. अंधेरीमधून देखील असाच बोगस लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरीतील क्वीन मार्केटिंग कंपनीच्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या बोगस लसीकरण प्रकरणी मुख्य आरोपी असलेला राजेश दयाशंकर पांडे याला मंगळवारी आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने शनिवार ७ ऑगस्टपर्यं पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सहा आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

३० जूनला आंबोली पोलीस ठाण्यात बोगस लसीकरणप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. अविनाश बिंद्या यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता. ते क्वीन मार्केटिंग कंपनीत वरिष्ठ पदावर काम करीत असून त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यासह त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेश पांडे यांनी त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ७ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर २१८ जणांना कोव्हिशिल्डचे लसऐवजी दुसरेच भेसळयुक्त द्रव्य वॅक्सिन म्हणून देऊन त्यांची फसवणूक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आंबोली पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 30 जूनला राजेश पांडेसह महेंद्र कुलदीप सिंग, संजय विनय गुप्ता, मोहम्मद अकब करीम, मनिष मंगलप्रसाद त्रिपाठी, राहुल उदयराज दुबे, शिवराज छोटू पठारिया आणि निता शिवराज पठारिया यांच्याविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत मंगळवारी राजेश पांडे याला पोलिसांनी अटक केली तर इतर सहाजणांचा लवकरच पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.


हेही वाचा – मुंबईच्या BKC तील अमेरिकन कॉन्सुलेटच्या कार्यालयाला धमकीचा फोन

First Published on: August 4, 2021 7:11 PM
Exit mobile version