कल्याणच्या मलंगगड रोडवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

कल्याणच्या मलंगगड रोडवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

आरटीओचा गलथानपणा; अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण पूर्वच्या मलंगगड रोडवर आरटीओने आपली नवी शाखा सुरू केली आहे. याठिकाणी आरटीओ अवजड वाहन आणि इतर गाड्यांची पासिंग करते. गाड्यांना पासिंग करण्यासाठी शेकडो गाड्या येथे येतात. मात्र या गाड्यांची आणि वाहन चालकांची व्यवस्था करण्यात आरटीओ पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. परिणामी, वाहन चालकांनाच या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओने एक ८० ते १०० फुटीच्या डांबरी रोड व्यतिरिक्त काहीच बनवलेले नाही. पावसाळ्यात पार्किंगच्या मैदानावर चिखल साचले. तिथे आरटीओने माती टाकली. मात्र या मातीमुळे अवजड वाहनांची चाकं फसत असल्याची माहिती एका वाहन चालकांनी दिली. ‘आपलं महानगर’ने आरटीओ ऑफिसजवळ जाऊन या सर्व गोष्टींची पाहणी केली. परिस्थिती फार गंभीर आहे, असे निदर्शनास आले. त्यामुळे आता येथे येणाऱ्या वाहन चालकांचा तिढा प्रशासन कधी सोडेल? की येथे येणाऱ्या वाहन चालकांना मनस्तापच सहन करावा लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

नंबर लागायला २४ तासांपेक्षा जास्त वेळ

दोन दिवसांपासून कल्याणच्या मलंगगड रोडवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उभ्या असलेल्या या गाड्यांमुळे रस्त्याने चालणाऱ्या नारिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गर्दीच्या वेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अवजड वाहनांच्या चालकांकडे पर्याय नसल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी दहा ते बारा तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. याशिवाय नंबर लागायला २४ तासांपेक्षाही जास्त कालावधी लागत असल्याची माहिती एका वाहन चालकाने ‘आपलं महानगर’ला दिली.

‘वीज आणी पाणी नाही’

आरटीओने मलंगगड रोडवर भल्यामोठ्या जागेत जरी नवी शाखा सुरू केली असली तरी कोणतीही सुविधा येथे येणाऱ्या वाहन चालकांना पुरवली जात नाही. पासिंगसाठी दोन दिवस थांबणाऱ्या वाहन चालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. याशिवाय इतके मोठे आरटीओ ऑफीस असूनही रात्री एकाही दिव्याने रोशनाई केली जात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार येथे घडण्याची दाट शक्यता आहे. वाहन चालकांना जेवणाची व्यवस्था नाही. जे खाद्य पदार्थ मिळतात, त्यांची किंमत दुप्पट तिप्पट असल्याची माहिती एका वाहन चालकाने दिली. याशिवाय पिण्याच्या पाण्याची एक लीटरची बाटली अवघ्या तीस रूपयांना मिळत असल्याची माहिती वाहन चालकांनी दिली.


हेही वाचा – कल्याणमधील मलंगगड किल्ल्याचा बुरुज ढासळला

First Published on: August 20, 2019 9:53 AM
Exit mobile version