गिरगावात भीषण आग; गोदामासह १४ वाहने जळून खाक; एकजण जखमी

गिरगावात भीषण आग; गोदामासह १४ वाहने जळून खाक; एकजण जखमी

मुंबई  -: गिरगाव, नवाकाळ पथ, मूगभाटमधील उरणकरवाडी नाक्यावर बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून त्यामध्ये एक बंद गोदामासह काही भंगार सामान आणि १४ दुचाकी, चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचे समजते. आगीपासून वाहने वाचविताना एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

प्राप्त माहितीनुसार, गिरगाव, मूगभाटमधील उरणकरवाडी नाक्यावर गेल्या अडीच वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या २५ × १०० चौ. फूट जागेतील लोखंडी पत्र्यांच्या एका बंद गोदामाला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. ही आग फटाक्यांमुळे लागल्याचे बोलले जात आहे. या आगीच्या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाला शेजारील तीन मजली रहिवाशी इमारतीला धडकत होत्या. तर रात्री १२ वाजताच्या सुमारास आगीची वृत्त समजताच बघ्यांची एकच गर्दी उसळली. एवढ्यात कोणीतरी अग्निशमन दलाला रात्री १२.१४ वाजता या आगीबाबत कळवले. त्याबरोबर अग्निशमन दलाची वाहने रात्रीच्या सुमारास रस्त्याने वाट काढत घटनास्थळी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास कशीबशी पोहोचली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर सदर आग विझविण्यास सुरुवात केली. यावेळी, जळालेल्या गोदामालगत पार्क केलेली ६ चारचाकी वाहने, ८ दुचाकी वाहने अशी एकूण १४ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गोदामात रेक्झिन, फोम, प्लास्टिक, बांबू, लाकडे आदी ज्वलनशील वस्तूंचा साठा होता, त्यामुळेच सदर आग काहीशी भडकली होती. काही स्थानिक नागरिकांनी काही दुचाकी, चारचाकी वाहने आगीपासून वाचवली. तर दुसरीकडे काही स्थानिक तरुण, नागरिक आगीची घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.

यावेळी, जळत्या गोदामाशेजारील तीन मजली इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते, अशी माहिती अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी, मध्यरात्री २.५५ वाजताच्या सुमारास अथक प्रयत्न करून सदर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

यावेळी, आगीपासून वाहनांना सुरक्षितता प्रदान करताना एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे समजते. मात्र त्याचे नाव समजू शकलेले नाही. सदर गोदामाला आग लागली, कशी, आगीचे नेमके कारण काय होते, आगीत किती प्रमाणात वित्तीय हानी झाली याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पोलीस चौकशी करून माहिती घेत आहेत.


नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा; भाजप आमदाराची मागणी

First Published on: October 27, 2022 12:55 PM
Exit mobile version