परवानगीआधीच मेट्रोनं कारशेडसाठीची झाडं कापली! स्थायी समिती अध्यक्षांचा आरोप

परवानगीआधीच मेट्रोनं कारशेडसाठीची झाडं कापली! स्थायी समिती अध्यक्षांचा आरोप

आरे वसाहतील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार्‍या कारशेडच्या प्रस्तावित कामांसाठी २२३८ झाडे कापण्याचा प्रस्ताव पुन्हा वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीला आला असता सदस्यांनी या झाडांची पाहणी केली. यामध्ये चक्क कारशेडच्या बांधकामाला आधीच सुरुवात झाली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे कारशेडची जागा ही ना विकास क्षेत्रात मोडत असून आता नव्या विकास आराखड्यात त्यावर कारशेडचे आरक्षण टाकण्यात आले आहे. परंतु हे आरक्षण मंजूर होण्यापूर्वी तसेच झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच याठिकाणी झाडे कापल्याचे निदर्शनास आल्याने सदस्यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कारशेडसाठीची झाडं कापलीच कशी?

अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २ हजार २३८ झाडे कापण्यास आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, काँग्रेसचे जगदीश अमित कुट्टी आणि राष्ट्वादी काँग्रेसचे कप्तान मलिक यांनी तीव्र हरकत घेत पुन्हा पाहणीची मागणी केली होती. यासाठी २० ऑगस्ट रोजी पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यानुसार मंगळवारी ही पाहणी पार पडली. परंतु ज्या ठिकाणची झाडे कापण्याचा प्रस्ताव आहे, त्या ठिकाणी कारशेडच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्या कामांसाठी काही प्रमाणात झाडेही कापण्यात आल्या असल्याची बाब यशवंत जाधव, जगदीश अमिन कुट्टी, सुवर्णा कारंजे, रिद्धी खुरसुंगे, उद्यान समिती अध्यक्ष उमेश माने तसेच कप्तान मलिक यांच्यासह इतर सदस्यांना पाहणीत दिसून आले. यावेळी आदिवासी पाड्यातील लोकांनी त्यांचे स्वागत केले आमचे पाडे वाचवा, असे साकडे घातले.

किती नवी झाडं लावली?

यावेळी पाहणीमध्ये झाडे कापण्यास परवानगी नसताना ती झाडे कापली कशी? असा सवाल त्यांनी केला. तर या ठिकाणी विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वी ना विकास क्षेत्र होते. तर मग विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वी ही झाडे कशी कापली? अशीही विचारणा या सदस्यांनी केली. परंतु, यावर एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही तर वृक्षतोडीला विरोध असल्याचे स्पष्ट करत यापूर्वी मेट्रोच्या कामांसाठी किती झाडे कापली? आण त्याऐवजी नव्याने किती लावली गेली आहेत? तसेच त्यातील किती झाडे जगली? याची माहिती दिली जावी, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.


हेही वाचा – हैदराबादमध्ये पाच दिवस सापाने केला मेट्रोने प्रवास!

झाडे लावण्यास जागाच नाही

मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये बाधित होणार्‍या झाडांची कापणी तसेच काहींचे पुनर्रोपण केले जाणार आहे. परंतु कापल्या जाणार्‍या एका झाडाच्या बदल्यात सहा झाडे लावणे बंधनकारक आहे. परंतु ही झाडे एमएमआरडीए कुठे लावणार आहे? याची विचारणा यावेळी सदस्यांनी केली. परंतु ही झाडे लावण्यासाठी एमएमआरडीएकडे जागाच नसून महापालिकेने झाडे लावण्यास जागा द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडे झाडे लावण्यास जागा नसल्याने कापलेल्या झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लागली जाणार नसल्याची भीती यशवंत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

तर मग एमआरडीए विरोधात गुन्हा दाखल करा – विरोधी पक्षनेते

प्रस्तावित मेट्रो रेल्वे कारशेडच्या कामात बाधित होणार्‍या झाडांची कापणी करण्यास वृक्षप्राधिरकणाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच या ठिकाणी यापूर्वी ना विकास क्षेत्र असताना झालेली झाडांची कत्तल बेकायदा आहे. त्यामुळे जर महापालिका विनापरवानगी झाड कापल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करत असेल, तर या ठिकाणी एमएमआरडीए विरोधातही गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

First Published on: August 20, 2019 9:02 PM
Exit mobile version