मुंबईत महापालिकेच्या बंद रस्त्यांची माहिती आता ‘गुगल मॅप’ वर

मुंबईत महापालिकेच्या बंद रस्त्यांची माहिती आता ‘गुगल मॅप’ वर

मुंबईत महापालिकेचे रस्ते बंद असल्याची माहिती आता 'गुगल मॅप' वर

मुंबई -: मुंबईकरांचा रस्त्यांवरील प्रवास आता आणखीन सुखकर होणार आहे. मुंबईत ज्या रस्त्यांची कामे सुरू असतील व ते रस्ते प्रवास करण्यासाठी बंद ठेवण्यात आले असतील त्यांची माहिती प्रथम गुगलला पालिकेतर्फे कळविण्यात येईल. त्यानंतर पुढील २४ तासांत ही माहिती ‘गुगल मॅप’ वर अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुंबईतील कोणत्याही बंद रस्त्यावरील माहिती घराबाहेर पडण्यापूर्वी मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

भविष्यात महापालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.), वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने मुंबई महापालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांची माहिती देखील ‘गुगल मॅप’ वर उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. तसेच, वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामानाने रस्ते अपुरे पडत आहेत. आहे त्या रस्त्यांवर फेरीवाले व लँडमाफिया यांचे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून पालिकेने नवीन रस्त्यांची कामे हाती घेतली आहे. तर कोस्टल रोड बनविण्यात येत आहे. दुसरीकडे मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. मात्र पालिकेच्या रस्त्यांवर जर काम सुरू असेल तर ते रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात.मात्र याबाबतची माहिती गुगलवर अद्यावत नसते. जर नागरिकांना, वाहन चालकांना नसेल व ते जर त्या बंद रस्त्यांवरून प्रवास करायला बाहेर पडले तर त्यांना सदर रस्त्यावरून प्रवास न करता माघारी फिरण्याचा धक्का खावा लागतो. त्याचा त्रास वाहन चालक, मालक व त्यांच्या कुटुंबियांना होतो.

याबाबतची गंभीर दखल मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने घेतली. या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला. महापालिकेचे जे रस्ते दुरुस्तीकामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती अग्रीम स्वरूपात ‘गुगल’ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे ‘गुगल मॅप’ वर रस्ता शोधतेवेळी सदर रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळणार आहे. तसेच बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्ग देखील ‘गुगल मॅप’ द्वारे दर्शविला जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

पालिकेचा पहिलाच प्रयोग यशस्वी

महापालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील, त्यांची माहिती पालिकेद्वारे अधिकृतपणे ‘गुगल’ ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येणार आहे. ही माहिती कळविल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती ‘गुगल मॅप’ वर अद्ययावत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील ‘गणपतराव कदम मार्ग’ येथे सुरू असलेल्या कामांची माहिती ‘गुगल’ला कळविण्यात आली होती. ज्यामुळे आता सदर ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर ‘क्लिक’ केल्यानंतर सदर रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती ‘गुगल’ला कळविण्यात येणार आहे.


‘मातोश्री’कडे वाकड्या नजरेनं पाहाल तर… ; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्याला इशारा

First Published on: April 22, 2022 5:45 PM
Exit mobile version