ड्रायव्हिंगसाठी मुंबई जगातलं सर्वात वाईट शहर!

ड्रायव्हिंगसाठी मुंबई जगातलं सर्वात वाईट शहर!

वाहतूक कोंडी

मुंबईतली ट्रॅफिक, मुंबईतले रस्ते, रस्त्यांवरचे खड्डे, नियम न पाळणारे वाहन चालक या सगळ्या गोष्टी मुंबईत राहणाऱ्यांसाठी काही नवीन नाहीत. किंबहुना तो त्यांच्या जगण्याचाच एक भाग होऊन गेला आहे. म्हणूनच, आजकाल ट्रॅफिक लक्षात घेऊन आपलाच दिवस लवकर सुरू करण्यासाठी आणि उशीरा संपवण्यासाठी मुंबईकरांची काहीही हरकत नसते. पण आता मात्र, या गंभीर समस्येची दखल आंतरराष्ट्रीय संस्थेनं घेतली आहे. जगातल्या १०० शहरांपैकी मुंबई हे वाहन चालवण्यासाठी सर्वात वाईट शहर असल्याचा निष्कर्ष या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे. त्यामुळे, मुंबईच्या विकासाची आणि मुंबईकरांचं राहणीमान सुधारण्याची टिमकी वाजवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी देखील हा इशाराच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

तीन मुद्द्यावर काढले निष्कर्ष!

वाहनांचे पार्ट बनवणाऱ्या मिस्टेर ऑटो या युरोपातल्या आघाडीच्या कंपनीने जगभरातल्या १०० प्रमुख शहरांमधल्या परिस्थितीचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये आलेले निष्कर्ष भारतासाठी आणि त्यातही मुंबईसाठी निराशाजनकच म्हणावे लागतील असे आहेत. अभ्यास करण्यात आलेल्या १०० शहरांमध्ये मुंबई सगळ्यात शेवटच्या म्हणजेच १००व्या क्रमांकावर असून कोलकाता ९८व्या क्रमांकावर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षा आणि किंमत या तीन घटकांवर आधारीत हा अभ्यास करण्यात आला. या तीन प्रमुख घटकांचे पुन्हा १५ उपघटक करून त्यावर आधारीत निरीक्षणं निष्कर्षात नोंदवण्यात आले आहेत.

ओट्टावाचाही समावेश!

कॅनडातील कलगरी शहर या अभ्यासात वाहन चालवण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि चांगलं शहर ठरलं आहे. सुटसुटीत वाहतूक, अपघातांचं कमी प्रमाण आणि स्वस्त वाहतूक पर्याय या आधारावर कलगरीने बाजी मारली आहे. त्याखालोखाल स्वित्झर्लंडमधील बर्न आणि टेक्सासमधल्या एल पासो शहराचा क्रमांक लागतो. दुबई आणि कॅनडातलंच ओट्टावा हे शहर देखील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये आहे.


हेही वाचा – अबब! ड्रग्जची तस्करी करण्यासाठी केलं गर्भवती असल्याचं ढोंग

मुंबई आणि कोलकात्याशिवाय मंगोलिया (९९), नायजेरिया (९७) आणि पाकिस्तानमधील कराची (९६) या शहरांमधील वाहतुकीची परिस्थिती देखील वाहनांसाठी वाईट असल्याचं या अहलावातून समोर आलं आहे.

First Published on: November 15, 2019 6:40 PM
Exit mobile version