पनवेल महापालिका क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

पनवेल महापालिका क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

पनवेल महानगरपालिका क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

पनवेल महानगरपालिका हद्दीत विद्यार्थांचे अपहरण करणे, काही अज्ञात व्यक्तीकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, दमदाटी करणे, नागरिकांची लुटमार करणे, निर्मनुष्य जागेमध्ये मद्यपान करणे तसेच अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस, आस्थापना यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश पनवेल महानगरपालिकेने दिले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्या संस्थांना पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नगरसेवकाच्या प्रस्तावाची पालिकेकडून दखल

पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनुचित घटना व गुन्हे रोखण्यासाठी महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, एस.टी. स्टॅन्ड, भाजी मार्केट यासारख्या रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नगरसेवक रविंद्र भगत यांनी पालिकेकडे केली होती़. शाळांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराबाबत अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत विचार करावा, असे उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. परंतु सदर बाबी शाळांबाबत आहे. पण खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये देखील अलिकडे अशा लैंगिक छळाच्या वा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. शाळेच्या आवारातून विद्यार्थ्यांना पळवून नेण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे नगरसेवक रविंद्र भगत यांनी महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला. त्यांच्या मागणीची दखल घेत पनवेल महापालिकेने अखेर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महाविद्यालय, शाळा, खाजगी कोचिंग क्लासेस यांना सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्व संबंधितांना दिल्या आहेत.

हेही वाचा – सायन – पनवेल महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

तर क्लास चालकांवर दाखल होणार फौजदारी गुन्हा

संबंधित क्लास चालकांनी महानगरपालिका अधिनियमातील कलम ३७६ नुसार विवक्षित व्यवसाय परवाना प्राप्त केला नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. सीसीटीव्ही बसविण्याबाबत व विवक्षित परवाने प्राप्त करण्याबाबत संबंधितांना पदनिर्देशिल अधिकारी तथा प्रमाण अधिकारी यांनी नोटीस द्यावी. याशिवाय महापालिका हद्दीत विना परवानगी जाहीरातबाजी करणाऱ्या क्लास चालकांना महाराष्ट्र मालमत्तांच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ च्या कलम ३ अन्वये व अनुषंगिक कायदे व नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही न बसवणे महागात पडणार

सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारीला आळा बसेल. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. या आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ व महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ व ७२ ( क) अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिकेन काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

First Published on: August 25, 2019 6:12 PM
Exit mobile version